डोंबिवलीमध्ये टेलरच निघाला अट्टल चोरटा, पोलीस चौकशीत 11 गुन्ह्यांची उकल
या गाड्या विकण्यासाठी त्याने अनेकांना चुना लावला. पालखीला जाणाऱ्या लोकांशी ओळख काढून तो गोड गोड बोलायचा आणि विश्वास संपादन करून तो गाड्या विकायचा.
डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पोलिसांनी मोटारसायकल चोरांविरोधात कडक पावले उचलली आहेत. अशाच एका गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी एका अट्टल दुचाकीचोराला अटक (Arrest) केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सायकल चोरी (Cycle Theft)च्या गुन्ह्याचा तपास करत असताना हा चोरटा (Thief) पोलिसांच्या हाती लागला. मोहम्मद इसाक युनूस खान अस या 54 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपीचा टेलरिंगचा व्यवसाय आहे.
चोराची अधिक चौकशी केली असता त्याने 11 मोटारसायकल चोरल्याचं कबुल केलंय. दुचाकी चोरून त्या विकण्यासाठीही तो अनोखी शक्कल लढवत होता.
सायकल चोरीची तक्रार दाखल झाली होती
डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोड परिसरातून सिंधू पिल्ले यांची सायकल अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
यासंदर्भात झोन 3 चे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त सचिन बाबासाहेब गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल बी. कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम बनवत आरोपीचा शोध पोलीस घेत होते.
यावेळी पोलिसांना सायकलवर जात असताना एक संशयित व्यक्ती आढळला. त्यानंतर पोलिसांना चोरीला गेलेली सायकल आणि आरोपीचा ठावठिकाणा याबद्दल माहिती मिळाली.
इलेक्ट्रिक सायकल टार्गेट करायचा
पोलीस लागलीच 90 फिट परिसरात पोहचले. यावेळी मोहम्मद हा सायकल घेऊन उभा होता. पोलीसांनी त्याला हटकले व चौकशी करत अटक केली. तपासात त्याने 11 दुचाकी चोरल्याचेही मान्य केले. विशेषतः इलेक्ट्रिकल दुचाकी तो टार्गेट करत होता.
या गाड्या विकण्यासाठी त्याने अनेकांना चुना लावला. पालखीला जाणाऱ्या लोकांशी ओळख काढून तो गोड गोड बोलायचा आणि विश्वास संपादन करून तो गाड्या विकायचा. याप्रकरणी अधिक तपास विष्णुनगर पोलीस करत आहे.