कामावरुन काढून टाकल्याचा राग, कर्मचाऱ्याने ‘असा’ शिकवला डॉक्टरला धडा
हॉस्पिटलमध्ये घुसलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी आधी तळमजल्यावरील पेशंट आणि नर्स यांना कोंडून ठेवलं. त्यानंतर लापसिया यांच्या घरात घुसून तिथून 1 किलो सोन्याच्या दागिन्यांसाह रोख रक्कम, हिरे असा 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल लुटून नेला.
निनाद करमरकर, TV9 मराठी अंबरनाथ : अंबरनाथमधील डॉ. उषा लापसिया यांच्या घरावर जुलै महिन्यात सशस्त्र दरोडा (Robbery) पडला होता. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी (Vitthalwadi Police) तीन महिन्यांनी दरोडेखोरांचा मग काढत एका महिलेसह एकूण 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कामावरून काढून टाकल्याच्या रागातून पूर्वी डॉक्टर लापसिया (Dr. Lapsiya) यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेनंच हा कट रचल्याचं तपासातून समोर आलंय. आरोपींपैकी एकाने दारुच्या नशेत मित्राला याबाबत सांगितले आणि पोलिसांनी थेट सर्वांना तुरुंगात डांबले.
काय आहे प्रकरण?
अंबरनाथमधील डॉक्टर उषा आणि हरीश लापसिया यांचं कानसई दत्तमंदिराजवळ उषा नर्सिंग होम हे हॉस्पिटल आहे. याच हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर लापसिया दाम्पत्य वास्तव्याला आहे. 11 जुलै रोजी रात्री डॉ. हरीश लापसिया हे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये असताना उषा लापसिया या रोजच्याप्रमाणे घराचं दार उघडं ठेवून झोपी गेल्या.
यानंतर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घुसलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी आधी तळमजल्यावरील पेशंट आणि नर्स यांना कोंडून ठेवलं. त्यानंतर लापसिया यांच्या घरात घुसून तिथून 1 किलो सोन्याच्या दागिन्यांसाह रोख रक्कम, हिरे असा 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल लुटून नेला.
जाताना हे दरोडेखोर सीसीटीव्हीचा डिव्हीआरही घेऊन गेले. त्यामुळं हे काम ओळखीतल्याच कुणाचं तरी असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र सर्व अंगांनी तपास करूनही 3 महिने शिवाजीनगर पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं.
यामुळं विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय हर्षल राजपूत यांच्याकडे तपासाची सूत्रं देण्यात आली. राजपूत आणि कॉन्स्टेबल मंगेश वीर यांनी आरोपींचा मग काढत त्यांना बेड्या ठोकल्या. यामध्ये डॉक्टर लापसिया यांच्याकडेच पूर्वी काम करणाऱ्या एका महिलेनं हा सगळा कट रचल्याचं समोर आलं.
लॅब टेक्निशियन महिलेने साथीदारांच्या मदतीने टाकला दरोडा
ज्योती सालेकर ही महिला पूर्वी लापसिया यांच्याकडे लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होती. मात्र ती रुग्णांकडून परस्पर पैसे घेत असल्याच्या तक्रारी आल्यानं डॉक्टर लापसिया यांनी तिला कामावरून काढून टाकलं होतं.
याचाच राग काढण्यासाठी ज्योतीने तिच्या ओळखीच्या चेतन दुधाने, हरीश घाडगे, अक्षय जाधव, कुणाल चौधरी, दीपक वाघमारे, तुषार उर्फ बाळा सोळसे यांना सोबत घेत हा दरोड्याचा कट रचला आणि दरोडा टाकला.
‘असा’ उघडकीस आला गुन्हा
दरोडा टाकल्यानंतर जणू काही झालंच नसल्याच्या अविर्भावात हे सगळे वावरत होते. त्यात 3 महिने होऊनही पोलीस आपल्यापर्यंत न आल्यानं आता दरोडा पचवल्याच्या आनंदात हे सगळे होते. मात्र त्याचवेळी त्यांच्यातल्याच एकाने दारू पिऊन मित्राला या दरोड्याबाबत सांगितले.
हे किस्से थेट पोलिसांपर्यंत पोहोचले आणि हे सगळे थेट गजाआड पोहोचले. या सर्वांकडून चोरीचं सोनं विकत घेणारे बाबूसिंग चदाणा आणि गोपाल रावरिया या दोन ज्वेलर्स व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी ही माहिती दिली.
यावेळी उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत हे देखील उपस्थित होते.
गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाला बक्षिस जाहीर
या गुन्ह्याची उकल करणारे पीएसआय हर्षल राजपूत आणि कॉन्स्टेबल मंगेश वीर यांच्यासह संपूर्ण पोलीस पथकाचा अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. इतकंच नव्हे, तर या पथकाला 50 हजार रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलं.