वर्धा – एखाद्या प्रवासादरम्यान आपण आपल्यासोबत असलेल्या लोकांसोबत आपल्या वस्तूंची काळजी घेत असतो. कारण असंख्य प्रवासी प्रवासादरम्यान आपल्याला भेटत असतात. समोर बसलेल्या एका अल्पवयीन मुलीबाबत काहीतरी चुकीचं घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशाने (passenger) पोलिसांच्या (Wardha Police) कानावर घातले. माहिती मिळताच रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेतून मुलीला ताब्यात घेतले. ही मुलगी बिहार (Bihar) राज्यातील असल्याची माहिती मुलीने पोलिसांना सांगितली. दोन आरोपी पळून जात असल्याचे आरपीएफ पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर दोघांना ताब्यात घेतले. ही घटना वर्धा जिल्ह्याच्या सेवाग्राम रेल्वे स्थानकात घडली आहे.
आरोपींची नावं मोहम्मद इमामूल आणि गुड्डू होना अशी आहेत. सापडलेले दोन्ही आरोपी बिहार राज्यातील आहेत. एकाच गावातील दोन्ही आरोपी असल्याने त्यांच्याबाबत पोलिसांनी पटकन माहिती शोधली. तसेच ही माहिती बिहार पोलिसांना दिली. बिहार पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे. दोघेजण अल्पवयीन मुलीला बिहार जिल्ह्यातील पूर्णिया गावातून पळवून नेत संघमित्रा एक्सप्रेसमधून घेऊन जात होते.रेल्वेगाडी सेवाग्राम स्थानकावरील फलाट क्रमांक 4 वर थांबली असता याची माहिती कर्तव्यावर असलेले उपनिरीक्षक ए.के. शर्मा यांना एका प्रवास्याकडून मिळाली. त्यांनी फलाटावर कर्तव्य बजावणाऱ्या काही जवानांना सोबत घेत तात्काळ एस 3 कोचमध्ये जात अल्पवयीन मुलीची आणि दोन युवकांची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेतले. दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता. दोघेजण मुलीला पळवून नेत असल्याचे उघड झाले. सध्या दोन्ही आरोपी आणि अल्पवयीन मुलीला बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
रेल्वे पोलिसांनी चाईल्ड लाईनशी संपर्क साधत मुलीची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्या ताब्यात दिले.त्यानंतर बिहार येथून आलेल्या पोलिसांना अल्पवयीन मुलींसह आरोपीला ताब्यात दिले. आरोपीसह मुलगी सुद्धा रेल्वेतून खोट्या नावाने प्रवास करत होती.
रेल्वे पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर यांची नावे वेगळी असून मुलगी अल्पवयीन असल्याच समोर आले.