Wardha News : रात्री दरवाजा ठोठावला, दार उघडताच दरोडेखोरांचा हल्ला.. फार्म हाऊसवर दरोडा, 55 पोते सोयाबीनसह पळवलं सोनं
वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथील कारंजा तालुक्यातील वाघोडा शिवारात फार्म हाऊसवर टाकून दरोडेखोरांनी सोयाबीनची 55 पोती तसेच सोन्याचा ऐवज चोरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.
वर्धा | 25 डिसेंबर 2023 : वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथील कारंजा तालुक्यातील वाघोडा शिवारात फार्म हाऊसवर टाकून दरोडेखोरांनी सोयाबीनची 55 पोती तसेच सोन्याचा ऐवज चोरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. तसेच यावेळी झालेल्या झटापटीमध्ये दरोडेखोरांनी चाकू मारल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. गोपाल पालीवाल असे त्याचे नाव असून त्याच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारंजा (घाडगे) पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय झालं ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील नारायण पालिवाल यांचे कारंजा (घाडगे) तालुक्यातील वाघोडा येथील शेतात फार्महाऊस आहे. आठवड्यातून एकदा ते सर्वजण त्या फार्महाऊसवर येतात. शेतातील पीक व शेतीचे उत्पन्न या फार्महाऊसवर ठेवले होते. नेहमीप्रमाणे रविवारी पालीवाल कुटुंब फार्महाऊवर गेले होते. रात्रीच्या सुमारास ते फार्महाऊसवर असताना, अचानक दरवाजा ठोठावला, त्यांनी दार उघडलं असता समोर असलेल्या दोन दरोडेखोरांनी त्यांना धमकावण्यास सुरूवात केली. त्यांच्या मागोमाग आणखी यावेळी आणखी पाच ते सहा जण घुसले आणि त्यांनी पालीवाल यांना धमकावण्यास सुरूवात करत मारहाणही केली. यावेळी फार्महाऊसवर नारायण पालिवाल, त्यांची आई हरिकुमारी पालीवाल आणि त्यांचा मुलगा गोपाल पालिवाल होते.
यावेळी झटापटीत दरोडेखोरांनी गोपाल पालिवाल यांना चाकू मारल्याने ते गंभीर जखमी झाले. आणि दरोडेखोरांनी त्यांची आई हरिकुमारी पालिवाल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने हिसकावले. तसेच तेथे ठेवलेले 55 पोते सोयाबीन लंपास केले. ही सर्व लुटालूट सुरू असताना, पालीवाल कुटुंबियांना दरोडेखोरांनी एका खोलीत डांबून ठेवले. या घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झाली. कारंजा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि गुन्हा दाखल केला.