लग्न विधी की अंत्यसंस्कार? कुटुंबाची द्विधा मनस्थिती, बहिणीच्या लग्नातच भावाने…
लग्नातील पाहुणे नाश्ता करत होते. नव वधूच्या लहान भावासोबत त्यांचा काही कारणावरून छोटासा वाद झाला. या कारणावरून चिडलेल्या भावाने थेट टोकाचे पाऊल उचलले. मात्र, यामुळे लग्नाचे विधी पूर्ण करायचे की अंत्यसंस्कार अशा कुटुंबाची द्विधा मनस्थिती झाली होती.
उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील महिमापूर गावात एक दुर्दैवी घटना घडली. त्याच्या बहिणीचे लग्न होते. त्याचा आधीच्या दोन बहिणींची लग्ने झाली होती. ही त्याची तिसरी बहिण आणि तो भावंडांमध्ये सर्वात लहान होता. बहिणीच्या लग्नासाठी वराकडील पाहुणे मंडळी शुक्रवारी रात्री त्यांच्या गावात येऊन पोहोचली. त्यांना यायला रात्री उशीर झाला. वधूकडील मंडळीनी पाहुण्यांचे स्वागत करण्यास सुरुवात केली. त्यांची सरबराई करण्यात वधूकडील मंडळी व्यस्त होती. यावेळी वधू नीरू हिचा लहान भाऊ छोटू आणि पाहुणे मंडळी यांच्यात काही कारणावरून वाद झाला. चिडलेल्या छोटूने घरातील खोली गाठली. रात्री दोनच्या सुमारास त्याने दारूच्या नशेत राहत्या घरात गळफास लावून घेतला. काही वेळाने कुटुंबीय खोलीवर पोहोचले असता छोटू लटकलेला पाहून त्यांना धक्का बसला.
छोटू याच्या कुटुंबीयांनी त्याला सीएचसी महमुदाबाद रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले. छोटू याच्या आत्महत्येने लग्न मंडपात शोककळा पसरली. बहिणीचे लग्न लावावे की छोटू याच्यावर अंत्यसंस्कार करावे अशी द्विधा मनस्थिती होती. अखेर, कुटुंबीयांनी आधी मुलीचा निरोप देण्याचा निर्णय घेतला. लग्नाची मिरवणुक निघाली. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी मृतदेह उचलून नेला
कुटुंबाने पोलिसांना न सांगता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. मात्र, आत्महत्येची घटना असल्यामुळे गावकऱ्यांनी पोलिसांनी त्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले तेव्हा मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरु होता. परंतु, पोलिसांनी कुटुंबियांच्या ताब्यातून मृतदेह घेत पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. सदरपूरचे प्रभारी निरीक्षक राकेश कुमार यांनी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे असे सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे त्या कुटुंबावर एकाच शोककळा पसरली आहे. एका मुलीला निरोप दिल्यानंतर तिच्या भावावर अंतिम संस्कार करण्याची वेळ या कुटुंबावर आली. सदर घटनेमुळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.