अल्पवयीन मुलांकडून अपघात झाल्यास शिक्षेची तरतूद काय?; कायदा काय सांगतो?
पालकांच्या नावे असलेले वाहन त्यांच्या अल्पवयीन मुलांनी चालवलं आणि त्यावेळी अपघात झाला तर शिक्षा काय होते असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. केंद्रीय मंत्रिमंडळाने मोटर वाहन कायद्यात दुरुस्तीला मंजुरी दिली असून त्यात काही नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत.
पु्ण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत, भरधाव वेगाने कार चालवत बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या अपघातामुळे एकच खळबळ माजली असून तेथील स्थानिकांनी तो अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या इतर मित्रांना चोप देत पोलिसांच्या हवाली केले. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे न्यायालयाने अवघ्या काही वेळातच त्या मुलांना जामीन दिला. त्यासाठी काही अटी ठेवत शिक्षाही सुनावली.
मात्र ती शिक्षा ऐकून लोकांचा आणखी संताप होतोय. दोघांच्या मृत्यूसाठी जबाबादार ठरलेल्या त्या मुलाला अपघात या विषयावर ३०० शब्दांचा निबंध लिहीणे आणि पोलिसांसोबत १५ दिवस ट्रॅफिक कंट्रोल करण्यास मदत करणे अशी शिक्षा देऊन त्याला जामीन देण्यात आला आहे. मात्र यामुळे संताप व्यक्त होतोय. हा मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला पोर्शेसारखी कार चालवायला कशी मिळाली असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
अल्पवयीन मुलांकडून अपघात झाल्यास शिक्षा काय ?
दरम्यान पालकांच्या नावे असलेले वाहन त्यांच्या अल्पवयीन मुलांनी चालवलं आणि त्यावेळी अपघात झाला तर शिक्षा काय होते असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. केंद्रीय मंत्रिमंडळाने मोटर वाहन कायद्यात दुरुस्तीला मंजुरी दिली असून त्यात काही नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मद्यपी चालक आणि अल्पवयीन वाहन चालकांना आळा घालण्यासाठीही नवीन नियम आखण्यात आले आहेत.
असा ( अलप्वयीन मुलाकडून) अपघात झाल्यास त्यासाठी पालकांना जबाबदार धरून त्यांना तीन वर्षांची शिक्षा आणि 25 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल. तसेच ज्या वाहनामुळे अपघात झाला त्या संबंधित वाहनाची नोंदणी कायमसाठी रद्द करण्याचीनवीन तरतूद देखील वाहन कायद्यात करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर अँब्युलन्स, फायर ब्रिगेडची गाडी अशा इमर्जन्सी वाहनांना रस्त्यात वाट करून दिली नाही तरी त्या वाहन चालकाला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.
दरम्यान ज्या मुलांचे वय चारपेक्षा अधिक आहे, त्यांनी दुचाकीवर बसल्यावर डोक्यावर हेल्मेट घालणे अनिवार्य असेल. मुलाने हेल्मेट घातले नसल्यास एक हजार रुपये दंड आणि त्या वाहन चालकाचा लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द होऊ शकतो. तसेच सिग्नल तोडणे आणि सीट बेल्ट न बांधणे यासाठीही एक हजार रुपये दंड आणि लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द होणार. गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असल्यास एक ते पाच हजारांचा दंड होऊ शकतो.