खोदकामात सोन्याची नाणी सापडली…दहा लाखांना व्यवहारही ठरला…पण नंतर जे काही घडलं ते धक्कादायक होतं…
सुरगाणा येथील काही व्यक्तींना खोदकाम करतांना सोन्याची नाणी सापडली असून ती विक्रीला असल्याची माहिती दादरा नगर हवेली येथील मुकेश खोंडे यांना मिळाली होती.
नाशिक : नाशिकच्या सुरगाणा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यांची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्याचे कारण असं की खोदकाम करतांना सोन्याची नाणी सापडली असून ती विकायचे असल्याचे सांगत दहा लाख रुपयांना गंडा घातला गेला आहे. या प्रकरणात दोघांना अटक झाली असून इतर साथीदार फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहे. दादरा नगर हवेली जिल्ह्यातील मुकेश खोंडे नावाच्या व्यक्तीने फिर्याद दिली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील एक चारचाकी कारही जप्त करण्यात आली आहे. सुरगाणा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणुकीची घटना घडल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरगाणा येथील काही व्यक्तींना खोदकाम करतांना सोन्याची नाणी सापडली असून ती विक्रीला असल्याची माहिती दादरा नगर हवेली येथील मुकेश खोंडे यांना मिळाली होती.
त्यानुसार मुकेश खोंडे यांनी दादारा नगर हवेली येथून थेट सुरगाणा गाठून नाणी खरेदीसाठी व्यवहार सुरू केला, त्यात हा व्यवहार 10 लाखांना ठरलाही गेला त्यानुसार 5 हजार रुपयांचा इसारही देण्यात आला.
काही दिवसांनंतर ठरलेल्या वेळेत आणि ठिकाणी तक्रारदार मुकेश खोंडे आणि त्यांचे मित्र सुरगाणा येथे आले. विक्रीदारही संबंधित ठिकाणी आले आणि बोलणी सुरू झाली.
बोलणी सुरू असतांनाच अचानक एक चारचाकी वाहन आले. आणि व्यवहार सुरू असतांना येऊन थांबले. काय करताय म्हणून विचारणा करत आम्ही पोलीस असल्याची बतावणी दिली आणि दहा लाख रुपये ताब्यात घेऊन पोबारा केला.
रमेश पवार आणि कमलाकर गांगुर्डे या दोघा संशयितांची नावे माहीत असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार दिली असून इतरांचा शोध पोलीस घेत आहे. या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
एकूणच सोन्याची नाणी, झालेल फसवणूक, दाखल झालेला गुन्हा आणि दोन जिल्ह्यातील व्यवहार पाहून सुरगाणा पोलीसही चक्रावून गेले असून तपासात आणखी काय समोर येते हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.