दारू पिऊन नशेत घरी आलेल्या पतीशी बायकोनं घातला वाद, एक लाथ बसली आणि…
दारूच्या नशेत पती घरी आल्यावर त्याचा बायकोसोबत वाद सुरू झाला. मात्र तो एवढा विकोपाला गेला की संतापाच्या भरात पतीने पत्नीच्या छातीवरच जोरात लाथ मारली. ती खाली कोसळली ते उठलीच नाही.
लखनऊ | 16 नोव्हेंबर 2023 : दारूचे व्यसन आणि नशा दोन्ही वाईट. त्या एका सवयीमुळे कित्येक संसार उद्ध्वस्त होता, कुटुंबाची वाताहत होते. तरीही लोकं दारू पिणं थांबवतं नाही. दारूपायी अशीच एक दुर्दैवी घटना घडून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे परस्पर वादामुळे एक कुटुंब पूर्णपणे विस्कळीत झाले. पत्नीच्या छोट्याशा बोलण्याने पती नाराज झाला आणि रागाच्या भरात त्याने तिला बेदम मारहाण केली, परिणामी तिचा मृत्यू झाला. तेव्हा तो दारूच्या नशेत होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला असून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू केला. मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भादंवि कलम ३०४/५०६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने पत्नीला मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.
आपापसात वाद झाला आणि पतीने पत्नीला थेट..
हे दुर्दैवी प्रकरण बिसांडा पोलीस ठाण्याच्या तेंदुरा गावातील आहे. येथील रामबाबू उर्फ दिवाना हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र 10 नोव्हेंबर रोजी तो दारू पिऊन त्या नशेतच घरी आला. तेव्हाच काही कारणावरून त्याचा पत्नीशी वाद झाला. दोघांमधील वाद इतका वाढला की रामबाबू संतापला आणि त्याने पत्नीच्या छातीवर जोरात लाथ मारली. ती वेदनेन कळवळू लागली, कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिची बरगडी तुटली होती. मात्र रुग्णालयात उपचारांदरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली असून, रडून-रडून त्यांची अवस्था बिकट झाली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपी पती अनेकदा दारू पिऊन त्याच्या पत्नीला मारहाण करायचा. त्याच्या या कृत्यामुळे त्याची पत्नी नेहमी त्रासलेली असायची, असे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी आरोपी रामबाबू याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक करत तुरुंगात धाडले.याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे.