गिरीडीह : पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेले अवैध संबंध (extra marital relation) पत्नी आणि मुलांना मान्य नव्हते. त्यावरून अनेक वेळेस भांडणेही झाली मात्र पती व त्या महिलेचे संबंध कमी झाले नाहीत. यामुळे भडकलेल्या पत्नीने त्या महिलेच्या हत्येचाच कट रचला आणि त्यासाठी खुनाची सुपारीही (contract killer) दिली. महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकून दिला, जेणेकरून कोणाला काही कळू नये, मात्र पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करत खुनाचे रहस्य उलगडले. मृतदेह मिळाल्यानंतर 9 दिवसांच्या आत गिरिडीह पोलिसांनी हत्येचा उलगडा तर केलाच शिवाय हत्येत सहभागी असलेल्या एका अल्पवयीन व्यक्तीसह अर्धा डझन लोकांना अटक केली. हे संपूर्ण प्रकरण झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील बगोदर पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे.
डीएसपी संजय राणा यांनी याबाबत माहिती दिली. 28 एप्रिल रोजी बागोदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोभाचांच जंगलात एका महिलेचा झाडाला बांधलेला मृतदेह आढळून आला होता. ती महिला त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जरमुने येथील रहिवासी राजेंद्र शहा यांची पत्नी असल्याचे समजले. याप्रकरणी राजेंद्र यांच्या लेखी अर्जावरून बगोदर पोलिस ठाण्यात अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गिरिडीहचे एसपी अमित रेणू यांनी विशेष तपास पथक स्थापन केले. या टीममध्ये अनेक पोलिसांसह टेक्निकल टीमचाही समावेश होता.
या प्रकरणाचा तपास करताना पथकाने मृत महिलेच्या मोबाईल क्रमांकातून दुवे शोधण्यास सुरूवात केली असता तिचा संपूर्ण इतिहास पोलिसांसमोर आला. ही मृत महिला रोजंदारी कामगार असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर ही महिला कामावर कधी आणि कुठे गेली होती, याचा शोध घेण्यात आला. यादरम्यान सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात होते. येथे 24 एप्रिलच्या संध्याकाळच्या फुटेजमध्ये कुंती एका महिलेसोबत दिसत होती. कुंतीसोबत दिसणारी महिला ही कुलगो येथील रहिवासी नीलकंठ महतो यांची पत्नी मीना देवी होती. त्यानंतर मोलिसांनी मीनाला अटक केली.
पोलिसांनी तिची चौकशी केली असता मीनाने तिचा गुन्हा कबूल केला. अजय कुमार याला सुपारी देऊन त्या महिलेची हत्या करायला लावल्याचे मीनाने सांगितले. मीनाची चौकशी केल्यानंतर खुनात सहभागी असलेल्या मुकेश यालाही अटक करण्यात आली. तो निमियाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंगा माती येथील रहिवासी आहे. मृत महिलेचे तिच्या गावातील भुनेश्वर साव याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. मात्र भुनेश्वर याच्या पत्नीला, बसंतीदेवी हे मान्य नव्हते, त्यावरून दोघांमध्ये अनेक वेळेस वादही झाले. मात्र त्यानंतरही त्या दोघांचे संबंध कायम होते. यामुळे भुनेश्वरच्या पत्नीने त्या महिलेला मारण्याची सुपारी दिल्याचे उघड झाले. नंतर बसंतीदेवी हिला अटक करण्यात आली.