धक्कादायक! बघण्याच्या कार्यक्रमात मिळालेल्या पैशातून पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी, शहर हादरलं
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, लग्नाच्या अवघ्या 15 दिवसांमध्येच पत्नीने सुपारी देऊन आपल्या पतीची हत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी मेरठमध्ये सौरभ राजपूत या तरुणाची हत्या करण्यात आली होती, या घटनेनं संपूर्ण उत्तर प्रदेश हादरलं होतं. दरम्यान आता या घटनेपेक्षाही अधिक भयंकर अशी घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील औरैयामध्ये घडली आहे. इथे एका नवविवाहित तरुणीने आपल्याच पतीच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना समोर आली आहे. या महिलेनं आपल्या बेरोजगार प्रियकरासाठी पतीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. लग्न झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांमध्येच तीने आपल्या पतीची हत्या केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेमध्ये एका शेतात पडला होता. दिलीप यादव असं त्याचं नाव होतं. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि तांत्रिक बाबींची मदत घेण्यात आली. त्यातून असं दिसून आलं की एक व्यक्ती दिलीप याला त्या शेताकडे घेऊन गेला होता. पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली, तपासामधून दिलीप याला बाईकवरून घेऊन गेलेल्या व्यक्तीचं नाव,रामजी नागर असल्याचं समोर आलं. या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचं नाव समोर आलं. अनुराग यादव असं या व्यक्तीचं नाव होतं.
पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली, तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. अनुराग यादव हा दिलीप यादव याच्या पत्नीच्या गावचा रहिवासी होता.त्या दोघांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रगती यादव असं मृत दिलीप यादवच्या पत्नीचं नाव आहे. ती या लग्नामुळे खूश नव्हती. मात्र तिचा प्रयिकर अनुराग यादव हा बेरोजगार होता, त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे तीने पैशांसाठी दिलीप यादव याच्यासोबत लग्न केलं. प्रगती यादवनं लग्नानंतर आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला, त्यासाठी तीने बघण्याच्या कार्यक्रमात तिला मिळालेल्या एक लाख रुपयांची सुपारी दिली. अनुरागने या कामाची जबाबदारी रामजी नागर याच्यावर सोपवली, त्यासाठी दोन लाख रुपयांचा सौदा ठरला होता. त्याला आधी एक लाख रुपये दिले आणि काम झाल्यानंतर एक लाख रुपये देऊ असं ठरलं होतं. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.