पत्नीची हत्या केली म्हणून 11 दिवस तुरुंगात गेला, मात्र 12 वर्षांनी जे सत्य समोर आले त्याने पोलिसही चक्रावले !
मनोजची पत्नी सीमा 2011 मध्ये अचानक घरातून गायब झाली. तिचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. यामुळे सीमाच्या माहेरच्या लोकांनी मनोजने तिची हत्या करुन मृतदेह लपवल्याचा आरोप केला. पत्नीच्या घरच्यांच्या आरोपानंतर पोलिसांनी मनोजला अटक केली.
अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या पत्नीच्या हत्ये प्रकरणी पतीला तुरुंगाची हवा खायला लागली, ती तब्बल 12 वर्षांनी सुखरुप सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. जनपद अमेठी येथील अली नगर येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सीमा वर्मा असे पत्नीचे नाव आहे तर मनोज कुमार असे पतीचे नाव आहे. सीमा 25 मार्च 2011 रोजी घरातून अचनाक गायब झाली होती. यानंतर तिच्या माहेरच्यांनी मनोजवर मुलीच्या हत्येचा आरोप केला होता. पोलीस पत्नीचा जबाब नोंदवण्यासोबतच अन्य कायदेशीर कारवाई करत आहेत.
काय आहे प्रकरण?
मनोजची पत्नी सीमा 2011 मध्ये अचानक घरातून गायब झाली. तिचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. यामुळे सीमाच्या माहेरच्या लोकांनी मनोजने तिची हत्या करुन मृतदेह लपवल्याचा आरोप केला. पत्नीच्या घरच्यांच्या आरोपानंतर पोलिसांनी मनोजला अटक केली. यानंतर 11 दिवस मनोजला तुरुंगात काढावे लागले.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही पत्नीच्या हत्या प्रकरण मनोजवर न्यायालयात खटला सुरु होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनोज लगातार पत्नीचा शोध घेत होता. अखेर 12 वर्षांनी मनोजच्या प्रयत्नांना यश आले.
जानेवारी 2023 मध्ये मनोजला त्याची पत्नी जिवंत असल्याची माहिती मिळाली. यानंतर मनोजने अधिक माहिती काढली असता पत्नी आपल्या तीन मुलांसह माहेरी राहत होती. मनोजने जनपद रायबरेली पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी पत्नीचा जबाब नोंदवत कारवाई सुरु केली.
सीमाने 12 वर्षांपूर्वी आपल्या प्रियकरासोबत पळून जात लग्न केले. हे माहित असूनही तिच्या घरच्यांनी खोटा आरोप करत मनोज विरोधात कोर्टात केस दाखल केली. पत्नीचा कोर्टात जबाब नोंदवून आपल्याला निर्दोष मुक्त करावे अशी मागणी मनोजने केली आहे.