अहमदाबाद: मसाज पार्लरमध्ये झालेली मैत्री एका विवाहितेला चांगलीच महाग पडलीय. तिने जवळच्या मित्रावर बलात्काराचा आरोप केलाय. पीडित महिलेने रविवारी पोलीस ठाण्यात रितसर बलात्काराची तक्रार नोंदवली. आरोपीने आपल्यावर वारंवार बलात्कार केला. आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याच तिने तक्रारीत म्हटलं आहे.
ओळख कधी झाली?
पीडित महिला वस्त्रपूर येथील एका स्पा सेंटरमध्ये नोकरी करते. आरोपी बरोबर फेब्रुवारी महिन्यात तिची कामाच्या ठिकाणी ओळख झाल्याचं तिने वस्त्रपूर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले
आरोपी स्पा सेंटरमध्ये अनेकदा यायचा. तिथे त्यांची चांगली ओळख झाली. ओळखीच रुपांतर पुढे मैत्रीत झालं. त्यांनी एकमेकांना परस्परांचे मोबाइल नंबर दिले. आरोपी तिला गोमतीपूर येथील आपल्या घरी तसच वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने आपल्यावर बलात्कार केला, तसंच कुठलीही कल्पना नसताना त्याने आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले, असं पीडित महिलेने तक्रारीत म्हटलय. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
आरोपी काय धमकी देत होता?
आरोपीने नंतर या व्हिडिओच्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपी आपल्याकडे 5 लाख रुपयांची मागणी करत होता. पैसे दिले नाहीत, तर ऑनलाइन व्हिडिओ पोस्ट करण्याची धमकी देत होता, असा आरोप पीडित महिलेने केलाय.
नवऱ्याने रुग्णालयात दाखल केलं
सततच्या या छळाला कंटाळून महिलेने विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या नवऱ्याने तिला रुग्णालयात दाखल केल. पीडित महिलेने नवऱ्याला सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोघांनी वस्त्रपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला.