जालना : हृदय हेलावून टाकणारी घटना जालन्यात घडली आहे. पती-पत्नी दोघे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन घेऊन घरी परतत असतानाच धक्कादायक घटना घडली. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी फाटा येथे जोडप्याच्या कारला अपघात झाला. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि यात पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे पती यातून सुखरुप बचावला आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. सविता साळुंके असे मयत महिलेचे नाव आहे. मात्र नक्की अपघात होता की घातपात याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
अमोल साळुंके आणि सविता साळुंके हे जोडपे जालना जिल्ह्यातील असून, त्यांना मूलबाळ नव्हते. मूलबाळ होत नसल्याने देवाकडे साकडे घालायला हे जोडपे बुलढाणा जिल्ह्यात श्री गजानन महाराज यांच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन घरी परतत असताना पहाटे 4 च्या सुमारास मंठा तालुक्यातील तळणी फाटा येथे त्यांच्या कारला पिकअप वाहनाने धडक दिली.
गाडीला अपघात झाल्याने पती लगेच गाडीतून बाहेर आला. पती बाहेर येताच गाडीने पेट घेतला. आगीने क्षणात रौद्र रुप धारण केले. स्थानिक पोलिसांना तात्काळ याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. महिला या आगीत जळून खाक झाली होती. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पोलीस या अपघाताचा वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत. पतीला काहीही इजा झाली नसल्याने हा नक्की अपघात आहे की घातपात याबाबत पोलीस तपास करत आहेत.