मोबाईलसाठी पतीशी भांडली, अन् उचललं टोकाचं पाऊल; अख्खं कुटुंब उध्वस्त झालं…
आजकाल बघावं त्याच्याकडे मोबाईल असतो. काहीजण तासन तास त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. पण मोबाईलचं हेच वेड लोकांच्या जीवावर बेतू शकतं. असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे ज्यामध्ये एका महिलेने मोबाईलवरून झालेल्या वादानंतर टोकाचं पाऊल उचललं.
लखनऊ| 4 सप्टेंबर 2023 : आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल (mobile) असतो. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला मोबाईल वापरता येतो. मात्र याच मोबाईलचे वेड जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली असून त्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं. उत्तर प्रदेशच्या ललितपूर येथे ही वेदनादायी घटना घडली आहे. तेथे एका महिलेने पतीशी भांडण झाल्यानंतर तिच्या दोन मुलांसह आयुष्य संपवण्याचा (crime news) प्रयत्न केला. त्यामध्ये ती महिला व मुलीचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे.
त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पती-पत्नीच्या भांडणामागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास सुरू केला आहे.
दोन मुलांसह केले विषप्राशन
मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय महिलेचे रविवारी सकाळी तिच्या पतीशी भांडण झाले होते. मोबाईलच्या मुद्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र त्यानंतर तिचा पती हा कामासाठी बाहेर निघून गेला. त्यानंतर त्या महिलेने रागाच्या भरात आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि टोकाचं पाऊल उचललं. तिने तिची 6 वर्षांची मुलगी आणि 3 वर्षांचा मुलगा या दोघांना विष दिलं आणि स्वत:ही ते खाल्लं. त्यांची तब्येत बिघडल्याचे तिच्या वहिनीच्या लक्षात आले , आणि त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावलं. त्यानंतर त्या तिघांनाही उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले.
मात्र रुग्णालयात आल्यावर डॉक्टरांनी पीडित महिला व तिच्या 6 वर्षांच्या मुलीला मृत घोषित केले. तर तिचा लहान मुलगा अद्यापही गंभीर असून मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.