ठाणे | 1 सप्टेंबर 2023 : रक्षाबंधनाचा (raksha bandhan) सण सर्वांनीच नुकताच आनंदात साजरा केला. मात्र या सणाला गालबोट लावणारी एक घटना ठाण्यात घडली आहे. तेथे एका महिलेने तिच्या अवघ्या वर्षभराच्या मुलासह आयु्ष्य (woman jumps off building) संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बहुमजली इमारतीतील आपल्या फ्लॅटच्या गच्चीतून तिने खाली उडी मारली. मात्र हे टोकाचं पाऊल उचलताना तिने आपल्या लहान लेकाचाही विचार केला नाही.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले असून, तेव्हापासून एकच खळबळ माजली आहे. घरगुती वादामुळे महिलेने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. प्रियांका मोहिते असे मृत महिलेचे नाव असून ती घोडबंदर रोड येथील एका इमारतीत पती आणि वर्षभराच्या मुलासह राहत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बहिणीकडे जाण्यास नवऱ्याने केली होती मनाई
पोलिसांच्या सांगण्यानुसार, 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी प्रियांकाला तिच्या बहिणीच्या घरी जायचे होते. मात्र तिच्या पतीने तिला तेथे जाण्यास मनाई केली. एवढ्या लहान मुलाला घेऊन प्रवास करू नकोस असे सांगत त्याने तिला जाण्यास नकार दिला. याच मुद्यावरून पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यांच्या वादानंतर रागावलेल्या प्रियांकाने तिच्या वर्षभराच्या लेकासह फ्लॅटच्या बाल्कनीतून थेट खाली उडी मारली. मध्यरात्री 1.30 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
काहीतरी जोरात, धपकन पडल्याचा आवाज ऐकून बिल्डींगमधील रहिवासी तेथे गोळा झाले आणि समोरील दृश्य पाहून ते हादरलेच. प्रियांका आणि तिचा छोटा लेक खाली रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांनी उपचारांसाठी तातडीने त्या दोघांना नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्या दोघांचेही मृदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आणि आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इमारतीतील मजल्यांची संख्या आणि पीडित महिला कोणत्या मजल्यावर राहते हे पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही.