तब्बल 30 लाखांची अंगठी… आधी पर्समध्ये ठेवली नंतर सरळ कमोडमध्येच फेकून दिली ! कारण ऐकून सगळे अवाक्
एक महिला गेल्या आठवड्यात केसांच्या ट्रीटमेंटसाठी क्लिनिक मध्ये गेली होती. तिथे तिने तिच्या हातातील महागडी अंगठी काढून एका बॉक्समध्ये ठेवली होती.
हैदराबाद : हैदराबादमधील एका स्किन अँड हेअर क्लिनिकमधील स्टाफला तिची हाव फारच महागात पडली. क्लिनिकमध्ये आलेल्या कस्टमरची महागडी अंगठी (expensive ring) तिने चोरली आणि पर्समध्ये टाकली. मात्र नंतर पकडले जाण्याच्या भीतीने तिने ती अंगठी कमोडमध्ये सरळ फ्लशच (flushed in toilet) करून टाकली. अखेर पोलिसांनी ती अंगठी हस्तगत केली. प्लंबरच्या मदतीने कमोडला जोडलेल्या पाईपलाईनमधून ही अंगठी काढण्यात आली असून चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यालाही अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला गेल्या आठवड्यात जुबली हिल्स या पॉश एरियातील एका स्किन आणि हेअर क्लिनिक मध्ये गेली होती. चेकअपदरम्यान तेथील स्टाफने त्या महिलेला हातातील अंगठी समोरच्या टेबलवरील बॉक्समध्ये ठेवण्यास सांगितली. त्याप्रमाणे त्या महिलेने तिच्या बोटातील तब्बल 30 लाख रुपयांची महागडी अंगठी काढून बॉक्समध्ये ठेवली. क्लिनिकमधील काम पूर्ण झाल्यानंतर ती महिला घरी गेली.
मात्र घरी पोहोचल्यानंतर तिच्या लक्षात आले की ती तिची महागडी अंगठी क्लिनिकमध्येच विसरून आली आहे. ती पुन्हा धावतपळत क्लिनिकनध्ये पोहोचली आणि तेथील कर्मचाऱ्यांकडे अंगठीबद्दल विचारण केली असता कोणीच काही बोलले नाही. खूप शोधाशोध करूनही अंगठी काही सापडली नाही. अखेर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या भीतीने अंगठी कमोडमध्ये फेकली
घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी क्लिनिकमधील सर्व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली, त्यांची तपासणीही करण्यात आली. मात्र कोणीच काही बोलेना. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच एका महिला कर्माचाऱ्याने, आपणच ती अंगठी चोरल्याचे कबूल केले. मी ती अंगठी उचलली आणि पर्समध्ये ठेवली. मात्र नंतर पोलिसांच्या भीतीने ती अंगठी टॉयलेटमधील कमोडमध्ये टाकून फ्लश केले, अशी कबुली त्या महिलेने दिली.
प्लंबरच्या मदतीने शोधकार्य
लाखो रुपयांची ही महागडी अंगठी कमोडमध्ये टाकून दिल्याचे ऐकताच पोलिसही सुन्न झाले. त्यानंतर तातडीने प्लंबरला बोलावण्यात आले आणि पाइपलाइन उघडून अंगठीचे शोधकार्य सुरू झाले. बऱ्याच वेळानंतर त्यांच्या मेहनतीमुळे अखेर ती हिऱ्याची अंगठी सापडली आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.