उत्तरप्रदेश : गेल्या काही दिवसांमध्ये खाकी वर्दीवरच व्हिडिओ ( Video ) बनविण्याचा ट्रेंड निर्माण झाल्याचे समोर आले आहे. अनेक पोलीस कर्मचारी हे वर्दीवरच शॉर्ट व्हीडिओ बनवत सोशल मिडियावर ( Social Media ) व्हायरल करत आहे. पण असे खाकी वर्दीवर व्हिडिओ बनवून ते सोशल मिडियावर शेयर करणे उत्तरप्रदेश येथील बरेलीच्या दोन महिला पोलीस ( Police ) कर्मचाऱ्यांच्या अंगलट आले आहे. बरेली येथील दोन महिला पोलीसांनी शॉर्ट व्हिडिओ बनवून शेयर केल्यानंतर ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी थेट निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस दलातील शॉर्ट व्हिडिओ तयार करून शेयर करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. ही कारवाई उत्तरप्रदेशच्या बरेली येथे जरी झाली असली तरी देशभरातील पोलीस दलात या कारवाईची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मिडियाचा वाढता प्रभाव इतका अनेकांच्या मनावर बिंबवला गेला आहे की, आपण वर्दीवर आहोत याचाही विसर अनेकांना पडलेला दिसून येतोय. असाच विसर उत्तरप्रदेशच्या बरेली येथील मुरादाबाद मंडलच्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पडला होता. वारंवार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्या सुचणेकडे या दोन्हीही महिला पोलिसांनी दुर्लक्ष केले होते.
महिला पोलिसांच्या वर्दीवरील शॉर्ट व्हिडिओबाबत थेट उत्तरप्रदेशच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी निलंबनाची कारवाई करत शॉर्ट व्हिडिओ बनविणाऱ्या दणका दिला आहे. दोन्ही महिलांना सोशल मिडियावरील वर्दीवरील सर्व व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेशही दिले आहे. याशिवाय इतर सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचे शॉर्ट व्हिडिओ करू नये अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.
संपूर्ण देशात वर्दीवर व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर शेयर करण्याचा एक प्रघात पडला आहे. त्यात महिला पोलिसांची संख्या मोठी आहे. त्यांच्या व्हिडिओवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया नोंदवत असतात. त्यात कौतुकापेक्षा पोलिसांवर नेटकरी थेट टीका करतांना दिसतात. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई करावी अशी मागणी अनेकदा होतांना दिसते आहे.
उत्तरप्रदेश मधील अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी कारवाईचा घेतलेला पुढाकार देशातील सर्वच अधिकारी घेतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात अशा शॉर्ट व्हिडिओ बनविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाचा चाप बसेल का ? ही पाहणे देखील महत्वाचे आहे.