चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्रात अपघात, उंचावरुन पडून कामगाराचा दुर्देवी मृत्यू
महाऔष्णिक वीज केंद्राच्या संच क्रमांक 5 मध्ये बॉयलरचे काम सुरु होते. यावेळी काम करत असताना सचिन गौरकर याचा तोल गेल्याने तो वरुन खाली कोसळला. उंचावरुन पडल्याने सचिन गंभीर जखमी झाला.
चंद्रपूर / निलेश डहाट (प्रतिनिधी) : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात उंचावरुन पडल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वीज केंद्राच्या संच क्रमांक 5 मध्ये हा दुर्दैवी अपघात घडला. बॉयलरचे काम करत असताना तोल जाऊन कामगार खाली पडून गंभीर जखमी झाला. मात्र अपघाताची घटना कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचण्यास आणि अॅम्बुलन्स एक तास उशिरा आल्याने जखमी कामगाराचा मृत्यू झाला. सचिन रमेश गौरकर असे मृत्यू झालेल्या 32 कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे व्यवस्थापनेविरोधात कामगार वर्गाने संताप व्यक्त केला. या घटनेची दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. दुर्गापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
बॉलरचे काम करताना तोल जाऊन खाली पडला
महाऔष्णिक वीज केंद्राच्या संच क्रमांक 5 मध्ये बॉयलरचे काम सुरु होते. यावेळी काम करत असताना सचिन गौरकर याचा तोल गेल्याने तो वरुन खाली कोसळला. उंचावरुन पडल्याने सचिन गंभीर जखमी झाला. घटना घडली तेव्हा तेथे कुणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. यामुळे घटनेची माहिती व्यवस्थापनाला मिळण्यास उशिर झाला.
वेळेत अॅम्बुलन्स न मिळाल्याने मृत्यू
व्यवस्थापनाकडे माहिती दिल्यानंतर अॅम्बुलन्स येण्यास जवळपास एक तास लागला. यानंतर जखमी सचिनला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे कामगाराला आपला जीव गमावावा लागल्याने इतर कामगारांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात रोष व्यक्त केला.
मृताच्या नातेवाईकांना मदत करण्याची मागणी
मृत कामगाराच्या वारसांना कंत्राटी पद्धतीत कायमस्वरूपी नोकरी आणि सुमारे 15 लाखांची नुकसान भरपाई देण्याची मागणी कामगारांनी केली. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र अधिकाऱ्यांनी कामगाराच्या वारसांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर सचिनच्या कुटुंबीयांना शव ताब्यात घेतले.