मामासोबत गटारी पार्टी अन् अवघ्या काही मिनिटांत भाचा रक्ताच्या थारोळ्यात, कल्याणमध्ये त्या रात्री काय घडलं?
मुंबईमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. गटारी साजरी करण्यासाठी मामासोबत पार्टी करणाऱ्या भाच्चाचा खून झाला आहे. कल्याण येथील गणेशनगरमधील घटना असून नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.
उसण्या पैशांच्या वादातून कल्याण पूर्वेकडील गणेशनगर परिसरात भर रस्त्यावर सूरज सोमा हिलम ( वय 25) या तरूणाला 20 ते 25 वयोगटातील तरूणांच्या सशस्त्र टोळक्याने लाकडी फळी, झाडू आणि दगडांचा वापर करून ठार केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच कल्याण क्राईम ब्रँचच्या युनिटने वेगाने तपास करत कल्याण कोळसेवाडी परिसरात सापळा रचत 24 तासाच्या आत तीन आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांच्या माहिती नुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास सूरज हा त्याच्या मामासह दारू प्यायला बसला होता. ओली पार्टी रंगात आली असतानाच अचानक तेथे 20 ते 25 वयोगटातील तरूणांचे टोळके आले. उसणे घेतलेल्या पैशांच्या देण्या-घेण्यावरून मारहाण केल्याचा राग मनात धरून रूपेश कांबळे आणि मोहन बनसोडे यांच्यासह टोळक्याने लाकडी फळी आणि झाडूसह दगडांचा मारा केल्याने सूरज हा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत ठार झाला. हे पाहून टोळक्याने तेथून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केल्यानंतर सूरजचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला.
या संदर्भात मृत सूरज याचा भाऊ पिंट्या हिलम याच्या फिर्यादीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा कोळसेवाडी पोलिसांसह क्राईम ब्रँचचे कल्याण युनिट समांतर तपास करत होते. अखेर क्राईम ब्रँचच्या हाती महत्वाचे धागे-दोरे लागले.
रूपेश महादेव कांबळे आणि मोहन रमेश बनसोडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून यात एका अल्पवयीन तरूणाचाही समावेश आहे. उर्वरित हल्लेखोरांचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजवरून या पथकाने खुन्यांना माग काढला. सूचक नाका रिक्षा स्टँडवर सापळा लावून या पथकाने रूपेश कांबळे, मोहन बनसोडे आणि एका अल्पवयीन तरूणाला ताब्यात घेतले. कसून केलेल्या चौकशी दरम्यान या तिघांसह अन्य काही तरुणांनी मिळून सूरज हिलम याला सशस्त्र हल्ला चढवून यमसदनी धाडल्याची कबुली दिली. या हत्याकांडातील अन्य हल्लेखोर भूमिगत झाले असून पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत.