‘शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा कधीच येणार नाही!’, तरुण शेतकऱ्यानं जीवनयात्रा संपवली
सरकार कोणतंही असो, त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाचा परिणाम शेतकरी आत्महत्या होताना सातत्यानं पाहायला मिळत आहे. पंढरपुरातील एका तरुण शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करुन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली.
पंढरपूर : राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन (Farmers Issue) सरकार उदासीन असल्याचा आरोप विरोधी पक्षांसह शेतकरी नेते आणि सामान्य शेतकऱ्यांकडूनही करण्यात येतो. मात्र, सरकार कोणतंही असो, त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाचा परिणाम शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) होताना सातत्यानं पाहायला मिळत आहे. पंढरपुरातील (Pandharpur) एका तरुण शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करुन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. महत्वाची बाब म्हणजे या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओही रेकॉर्ड केलाय या व्हिडीओमध्ये तो विषारी औषध घेताना दिसून येत आहे.
पंढरपूर तालुक्यातील मगरवाडीचा सुरज जाधव या तरुण शेतकऱ्यानं विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. विष प्राशन करतानाचा स्वत:चा व्हिडीओही त्याने व्हायरल केला. त्यानंतर या तरुणाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला.
तरुणाकडून विष प्राशन करताना व्हिडीओ रेकॉर्ड!
विष प्राशन करताना या तरुणाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केलीय. ‘पुन्हा कधी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही. आपलं आयुष्य इथपर्यंतच होतं. शेतकरी नामर्द आहे. शेतकऱ्याच्या जन्माला आपण कधीच येणार नाही. सरकारसुद्धा शेतकऱ्याच्या नादी लागत नाही. शेतकऱ्याचा कधीही विचार करणारं नाही हे सरकार. जोपर्यंत शेतकरी आहे तोपर्यंत सरकार नाही’, असं म्हणत सुरजने विष प्राशन केलं.
गोपीचंद पडळकरांकडून शोक व्यक्त
‘पंढरपूरचा हा तरणाबांड शेतकरीपुत्र आत्महत्येपूर्वी म्हणतो “शेतकरी नामर्द आहे,शेतकऱ्याच्या जन्माला कधीच येणार नाही” हे म्हणायची वेळच या सरकारनं शेतकऱ्यांवर आणली आहे.भावांनो, कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका.संघर्ष आपल्या रक्तात आहे,आपण आपला वाटा हिसकावून घेऊ.भावपूर्ण श्रद्धांजली’ असं ट्वीट करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुरजला श्रद्धांजली अर्पण केलीय.
राजू शेट्टींचं सरकारवर टीकास्त्र
“शेतक-याच्या बच्छड्यानो इतके टोकाच पाऊल उचलू नका , या नादान राज्यकर्त्यांच्या नरडीचा घोट घेऊ पण आपले आयुष्य संपवू नका. पंढरपूर येथील मगरवाडी तालुक्यातील सूरज जाधव या शेतकरीपुत्राने स्वतःची चित्रफित बनवत सरकारला जाब विचारून आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना एक दाण्याचे हजार दाणे करणा-या माझ्या शेतक-यावर येत आहे. ईडी, भ्रष्ट्राचार, बलात्कार यासारख्या गोष्टीत गुरफटलेल्या या सरकारला शेतक-यांकडे दुर्लक्ष करत असताना लाज कशी वाटत नाही. कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळलेल्या राज्यकर्त्यानो तुम्ही जनाची नाही मनाची म्हणून तरी लाज बाळगा. शेतक-याची पोर किडा मुंगीसारखी मरत आहेत तुम्ही मात्र कोडगेपणाने फक्त पाहत राहता.हिच पोरं एक दिवस तुम्हाला रस्त्यावर नागडं करून पायाखाली तूडवून मारतील तो दिवस फार लांब नाही”, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टद्वारे सरकारवर जोरदार टीका केलीय.
इतर बातम्या :