एक्स-बॉयफ्रेंडचा बदला घ्यायला गेली, पण घडलं भलतंच…. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा नाहक गेला जीव ! त्या दिवशी नक्की काय झालं ?
एका शुल्लक कॉमेंटवरून सुरू झालेला वाद तरूणाच्या जीवावर बेतला. वादावादीनंतर झालेल्या हल्ल्यात भलताच जखमी झाला.
इंदूर | 27 जुलै 2023 : कारमधून जाणारी तरूणी आणि तिच्या मित्रांवर केलेल्या कमेंटमुळे काही तरूणांमध्ये वाद झाला आणि तो भलताच महागात पडला. दोघांच्या भांडणात तिसऱ्या व्यक्तीचा नाहक जीव (death) गेला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर (crime news) हादरलं.
इंदूर शहरातील विजय नगर चौकात चाकूने भोसकून बीटेकच्या विद्यार्थ्याची हत्या केल्याप्रकरणी एका मुलीसह ३ आरोपींनी नुकतेच आत्मसमर्पण केले. दुसऱ्या व्यक्तीला धडा शिकवायचा होता, पण चुकून तिसऱ्याच तरूणाची हत्या केल्याचे आरोपी तरूणीने पोलिसांच्या चौकशीत कबूल केले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
खरंतर हे संपूर्ण प्रकरण इंदूरच्या विजय नगर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. तेथे मोनू उर्फ प्रभास पवार, रचित, विशाल ठाकूर आणि टिटू हे मित्र कारमधून चहा पिण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी ॲक्टिव्हावर आलेली एक तरूणी व तिच्या साथीदारांनी, कारमध्ये बसलेल्या तरूणावर हल्ला केला. मात्र तो थोडक्यात वाचल्याने त्यांनी मोनू उर्फ प्रभास या दुसऱ्या तरूणावर वार केला. त्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी तत्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले पण तेथे दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. जिथे ही हत्या झाली तेथील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासले आणि ॲक्टिव्हाच्या नंबर प्लेटच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोर तरूणी तानिया हिला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने स्वत:हूनच पोलीस स्थानक गाठत आत्मसमर्पण केले.
एका कमेंटमुळे झाला वाद
तानिया आणि कारचालक टिटू यांची आधीपासूनच मैत्री होती. हत्येच्या दिवशी टिटू त्याच्या मित्रांसोबत बाहेर पडला होता. तेव्हा त्याला तानिया तिच्या इतर दोन मित्रांसोबत ॲक्टिव्हावर फिरताना दिसली. ते पाहून टिटू व त्याच्या इतर मित्रांनी तानियावर कमेंट केली. यामुळे ती संतापली आणि ती तिच्या मित्रांसह टिटू व इतर तरूणांशी वाद घालू लागली.
त्यांचे भांडण चांगलेच पेटले. अखेर तानियाने टिटू आणि त्याचा मित्र रचित यांच्यावर चाकूने हल्ला केला. मात्र ते दोघेही थोडक्यात बचावले. तेव्हा संतापलेल्या तानियाने टिटूचा दुसरा मित्र मोनू उर्फ प्रभासवर चाकूने हल्ला केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि उपचारांदरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.