गंगापूर (औरंगाबाद) : सध्या नुपूर शर्माच्या पैगंबर मंहमद यांच्याविषयीच्या त्या वादग्रस्त विधानामुळे देशात वातावरण तंग झाले आहे. त्यामुळे देशाच्या अनेक भागात अंदोलने करण्यात आली आहेत. तसेच आंदोलन औरंगाबादमध्ये (Aurangabad) ही करण्यात आले होते. राज्यात वादग्रस्त विधानावरून धार्मिक तेढ निर्माण झाले असतानाच आता औरंगाबादच्या गंगापूर पोलीस ठाण्यातंर्गत (Gangapur Police Thane) एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे व्हाट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस (WhatsApp Status) ठेवल्याप्रकरणी एका तरुणास 12 ते 15 जनांनी मारहाण केली. त्यानंतर याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर मारहाण करणाऱ्या 11 आरोपींसह स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एका तरुणाने व्हाट्सअॅपवर काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास आक्षेपार्ह स्टेटस ठेवले. यामुळे झालेल्या वादातून मुस्लिम धर्माच्या 12 ते 15 तरुणांनी स्टेटस ठेवणाऱ्या तरूणास घेराव घातला. तसेच त्याला धमकावत शिवीगाळ करून मारहाण केली. यात तो तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचप्रमाणे धारदार शस्त्राने तरुणाच्या गळ्यावर वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या तरुणाच्या मोटर सायकलची देखील तोडफोड करण्यात आली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणून गुन्हा करून घेतला. तर फरार झालेल्या आरोपींपैकी 11 आरोपींना रात्रीत या गुन्ह्यात अटक केली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या व मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावण्याचा कारणीभूत झालेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथक रवाना करण्यात आली आहे.
दरम्यान औरंगाबादमध्ये झालेल्या आंदोलनानंतर कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी गंगापूर शहरात व संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात दंगा काबू पथक ठिक ठिकाणी तैणात करण्यात आले आहेत. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.