ऑनलाईन भामटयांचं चांगभलं! केंद्राच्या योजनेचे नाव सांगत कर्जाचे आमिष दाखवत असं गंडावतात, ऐकून पोलीसही चक्रावले
डिजिटल क्रांतीमुळे आर्थिक व्यवहारात सुलभता आली असली तरी दुसरीकडे ऑनलाइन भामटयांनी नवनवीन शक्कल लढवून अनेकांची फसवणूक केल्याच्या घटना समोर येत असल्याने सायबर पोलिसांची चिंता वाढत चालली आहे.
नाशिक : अलिकडच्या ऑनलाईन व्यवहार करत असल्याने नागरिकांच्या वेळेची बचत होते. डिजिटल क्रांतीमुळे आर्थिक व्यवहाराला गती मिळाली आहे. पण हीच बाब हेरून गंडा घालणारे कमी नाहीत, तुमच्या हातून चुक घडावी असाच हेतु ठेऊन फसवणूक केल्याच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. त्यामुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करतांना काळजीपूर्वक करण्याच्या सूचना अनेकदा सायबर पोलीस देतात. मात्र, ऑनलाईन गंडा घालणारे भामटे अशी काही शक्कल लढवतात की व्यक्तीची फसवणूक झाल्यावरच लक्षात येते की आपली फसवणूक झाली. अशीच एक घटना नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात घडली आहे. मालेगाव तालुक्यातील पोहाणे या गावातील केंद्राच्या कर्ज योजनेची माहिती देत आठ ते दहा जणांनी साडेअठरा लाख रुपये उकळले आहे. गोरख दादाजी भामरे यांनी वडणेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरख दादाजी भामरे हा तरुण शेती आणि दुग्ध व्यवसाय करतो, केंद्राची पंतप्रधान कर्ज योजना असल्याचा त्याला मोबाइलवर मेसेज आला होता.
त्यामध्ये कर्ज घेतलेल्या रकमेला दोन टक्के व्याज आणि पन्नास टक्के सूट असल्याची बाब नमूद केलेली होती, त्यानुसार गोरख याला वेगवेगळ्या व्यक्तीने कागदपत्रांसाठी फोन केले.
याच दरम्यान प्रोसेस करण्यासाठी काही वेळेस बँक खात्याचे डिटेल्स मागविले तर काही वेळेस आलेले ओटीपी त्यामुळे तरुणाच्या खात्यात असलेल्या खत्यातून जवळपास साडेअठरा लाख रुपये लंपास केले आहे.
ऑनलाइन भामटयांनी यामध्ये केंद्राच्या योजनेचे आमिष दाखविले त्यात कर्ज देतांना पन्नास टक्के सुट असून 2 टक्केच व्याजदर असल्याचे सांगितले त्यात विश्वास संपादन करत कागदपत्रे पाठवा म्हणून विनंतीही केली.
खात्यातून लाखों रुपये लंपास झाल्याची बाब लक्षात आल्याने तरुणाने पोलिसांत तक्रार दिली होती, त्यामध्ये चौकशी करून स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.