दोन दिवसांपासून बेपत्ता, शेतातल्या विहिरीत तरुण-तरुणीचा मृतदेह, आत्महत्या की घातपात? पोलिसांपुढे मोठं आव्हान
गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुण आणि तरुणीचा मृतदेह काल (13 ऑक्टोबर) सायंकाळी पिंपळगाव गावाच्या बाहेर एका विहिरीत आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
बुलडाणा : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुण आणि तरुणीचा मृतदेह काल (13 ऑक्टोबर) सायंकाळी पिंपळगाव गावाच्या बाहेर एका विहिरीत आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह विहिरीबाहेर काढले. यावेळी ग्रामस्थांनी सुद्धा याठिकाणी मोठी गर्दी केली होती. मात्र या दोघांनी आत्महत्या केली किंवा काही घातपात झालाय का? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या दोघांचे प्रेमसंबंध होते, असं गावकरी दबक्या आवाजात बोलत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील प्रमोद ऊर्फ सुरेश भांबळकर आणि दुर्गा सावरकर हे दोघेही 11 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दोघेही हरविल्याची नोंद करण्यात आली होती. त्या दोघांचा शोध सुरु असताना काल (13 ऑक्टोबर) सायंकाळी एका विहिरीत दोघांचा मृतदेह आढळळा. पिंपळगाव राजा येथील शेतकरी विठ्ठल पाटील हे शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत तरुण-तरुणीचे मृतदेह तरंगताना दिसले.
पोलिसांकडून तपास सुरु
शेतकरी विठ्ठल पाटील यांनी तातडीने पोलिसांना संपर्क करुन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांचेही मृतदेह बाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. तर विहिरीच्या बाजूला एक दुचाकी सुद्धा अपघातग्रस्त अवस्थेत आढळल्याने या प्रकरणाचे गौडबंगाल वाढले आहे. हा घातपात आहे की आत्महत्या? हे अजूनही स्पष्ट झाले नाहीय. पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल. मात्र या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे ग्रामस्थ दबक्या आवाजात बोलत आहेत.
आई-वडिलांनी मोबाईल खेळतो म्हणून हटकलं, मुलाची विहिरीत उडी
दुसरीकडे बुलडाण्यातच काही दिवसांपूर्वी एक विचित्र घटना समोर आली होती. घरातील सदस्यांनी मोबाईलवर गेम खेळतो म्हणून हटकल्याने 16 वर्षीय मुलाने रागात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्याच्या या निर्णयाने मात्र कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता. संबंधित घटना ही बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे घडली होती. मृतक 16 वर्षीय मुलाचं राहुल राऊत असं नाव आहे. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक सत्र हे ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन दिले. मात्र या शिक्षणासोबतच मुलं ऑनलाईन गेमच्या सुद्धा आहारी जात असल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला.
राहुल सतत मोबाईलवर गेम खेळत बसायचा. त्यामुळे त्याच्या पालकांनी मोबाईलमध्ये गेम खेळू नको म्हणून हटकले. त्यानंतर तो रागाच्या भरात घरातून निघून गेला. आपल्या पालकांचा बोलण्याचा त्याला प्रचंड राग आला होता. त्यामुळे आपण घरी येणारच नाही, असं रागात तो म्हणाला होता. त्यानंतर त्याने रागात स्वत:चा जीव देवून आई-वडिलांना आयुष्यभराची शिक्षा देण्याचा विचार केला. राहुलच्या घराशेजारीच एक विहीर आहे. राहुलने मागचापुढचा कोणताही विचार न करता थेट विहिरीत उडी मारली. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा दुर्देवाने विहीरीत बुडून मृत्यू झाला.
हेही वाचा :
अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी पैशांची मागणी; काँग्रेसच्या नगरसेवकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
बायकोला छळण्यासाठी नवऱ्याने ‘आत्महत्ये’चा बनावट व्हिडीओ पाठवला, पोलिसांनी बनाव कसा उघड केला?