मुलीशी मैत्री करणं पडलं महागात, वडील आणि भावाने तरूणाला संपवलं; दूर राहण्याची दिली होती वॉर्निंग
मुलीशी मैत्री केल्याच्या रागातून वडील व दोन मुलांनी हे धक्कादायक कृत्य केले. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
नवी दिल्ली : राजधानीत गुन्ह्याच्या (crime) घटना वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. त्यातच आणखी एका हृदयद्रावक घटनेची भर पडली आहे. एका मुलीशी मैत्री करणं 25 वर्षांच्या युवकाच्या जीवावरच (youth) बेतलं. त्या रागातून मुलीचे वडील आणि भावांनी या तरूणावर चाकूने वार (stabbed to death) केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जाफराबाद येथील कल्याण सिनेमा जवळ गल्ली क्रमांक 2 येथे ही धक्कादायक घटना घडली. सोमवारी संध्याकाळी 5:15 च्या सुमारास घडलेल्या या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. सलमान असे मृत तरूणाचे नाव असून तो 25 वर्षांचा होता. तो जाफराबाद मधील ब्रह्मपुरी येथील रहिवासी होता. त्याच्या गळ्यावर आणि छातीवर वार करण्यात आले, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे.
मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हती मैत्री
सलमानची एका मुलीशी गेल्या दोन वर्षांपासून मैत्पी होती, मात्र तिच्या घरच्यांना हे बिलकूलच मान्य नव्हतं. त्यांनी सलमानला मुलापासून लांब राहण्याचा इशाराही दिला होता. मात्र सलमानने त्यांचे न ऐकता त्या मुलीशी मैत्री कायम ठेवली. यामुळे मुलीचे पिता मंझूर हे नाराज होते व त्यांनी आपल्या दोन मुलांसह सलमानवर हल्ला केला. त्यावेळी तो बाईकवरून बाहेर जात होता. तिघांनी त्याच्यावर हल्ला करत त्याच्या गळ्यावर आणि छातीवर वार केले. हल्ल्यानंतर पिता व दोन्ही पुत्र फरार झाले असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून अशा कारणामुळे कोणाचाही जीव घेणे अतिशय क्रूर असल्याची प्रतिक्रिया लोकांद्वारे व्यक्त होत आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडून तुरूंगात टाकावे, अशी मागणीही होत आहे.