इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने यूट्युब पाहून घरी दूधीचा ज्यूस बनवून प्यायला. ज्यूस प्यायल्यानंतर तरुणाला उलट्या आणि जुलाब होऊ लागले. त्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. धर्मेंद्र करौली असे मयत तरुणाचे नाव आहे.
इंदूरच्या विजयनगर पोलीस स्टेशन हद्दीतील स्वर्णिम बाग कॉलनीत धर्मेंद्र राहत होता. तो व्यवसायाने ड्रायव्हर होता. बुधवारी सकाळी त्याच्या डाव्या हाताला तीव्र वेदना जाणवू लागल्या. म्हणून तो बाजारात गेला आणि दूधी खरेदी करुन घेऊन आला.
घरी आल्यानंतर यूट्युबवर धर्मेंद्रने दूधीचा ज्यूस बनवण्याची रेसिपी पाहिली. रेसिपी पाहून त्याने ज्यूस बनवून प्यायला आणि झोपी गेला. मात्र त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली.
धर्मेंद्रला उलट्या आणि जुलाब होऊ लागले. थोड्या वेळाने त्याची प्रकृती जास्तच बिघडू लागली. म्हणून घरचे त्याला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रुग्णालय प्रशासनाने तरुणाच्या मृ्त्यूबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी करत प्रकरण जाणून घेतले. मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे विजयनगरचे डीसीपी संपत उपाध्याय यांनी सांगितले.
दूधीचा ज्यूस प्यायल्यानंतर तरुणाच्या आकस्मिक मृत्यूने सर्वच जण हैराण झाले आहेत. तरुण मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.