जुना वाद उफाळून आला, युवकाचा गेम झाला, ४ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

| Updated on: Jul 24, 2023 | 10:03 PM

तिन्ही संशयित मोपेडवरून आले. त्यांना बघताच तुषार स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाला.

जुना वाद उफाळून आला, युवकाचा गेम झाला, ४ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Follow us on

नाशिक : नाशिकच्या उपनगर परिसरातील बोधले नगर येथे तुषार चावरे या युवकाची हत्या करण्यात आली. मारहाणीचा बदला घेण्यासाठी हत्या झाल्याचे समोर आले आहे. खुनाची घटना घडल्यानंतर कोणताही मागमूस नव्हता. उपनगर पोलिसांनी काही तासांतच या हत्येत सहभागी असलेल्यांना अटक केली. यात मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदाराचा पाठलाग करण्यात आला.

अशी आहेत अटकेतील आरोपींची नावे

सुलतान मुख्तार शेख (वय २१ वर्षे), रोहीत मनोहर पगारे (वय १८ वर्षे, दोघे रा. गांगुर्डे चौक, पंचशीलनगर, उपनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

तुषार जीव वाचवण्यासाठी पळाला

शनिवारी रात्री साडेसात ते पावणेआठ वाजेच्या सुमारास पुणे रोडवरील बोधलेनगर जवळून तुषार एकनाथ चावरे (वय १८ वर्षे रा. सुयोगनगर, बोधलेनगर) हा मित्र सचिन गरुड याच्यासह दुचाकीवरुन जात होता. त्याचवेळी वरील तिन्ही संशयित मोपेडवरून आले. त्यांना बघताच तुषार स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाला.

सपासप वार करून खून

त्यानंतर संशयितांनी त्याचा पाठलाग करुन चॉपर आणि धारदार हत्यारांनी डोक्यावर, पोटावर, पाठीवर धारदार हत्यारांनी सपासप वार करून खून केला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयितांना पकडण्यात आले. काही दिवसांपूर्वी मृत चावरे याने संशयित आरोपी सुलतानला मारहाण केली होती.

प्लॅनिंगनुसार तुषारला संपवले

तो या मारहाणीला प्रत्युत्तर देण्याची वाट पाहत होता. त्यातच दोघांचे काही दिवसांपूर्वी इंदिरानगर भागात भांडणही झाले होते. त्यामुळे पूर्वी झालेली मारहाण आणि भांडणाचा बदला घेण्यासाठी संशयितांनी चावरेला संपवायचे असा निश्चय करत मद्यपान केले. त्यानंतर केलेल्या प्लॅनिंगनुसार तुषारची हत्या करण्यात आली. अशी माहिती पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली.