वाजत गाजत वरात निघणार होती तरुणाची, पण आदल्या दिवशी थेट अंत्ययात्राच निघाली, काय घडले नेमके?
दोघा भावांमध्ये जमिनीवरुन वाद सुरु होता. जमिनीसाठी काकाला रक्ताच्या नात्यांचाही विसर पडला. काकाने पुतण्यासोबत जे केले कुणी शत्रूसोबतही करणार नाही.
आरा : बिहारमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज असलेल्या नवरदेवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. लग्नाच्या आदल्या दिवशी काकाने पुतण्याला संपवल्याची घटना बिहारमधील आरा येथे घडली आहे. नवादा पोलीस स्टेशन परिसरातील संकट मोचन न्यू पोलीस लाईन परिसरात ही घटना घडली. कौटुंबिक वादातून काका आणि चुलत भावांनीच नवरादेवाला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. मृताच्या वडिलांनी आपला भाऊ आणि पुतण्यांवर मुलाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. सोमवारी या तरुणाचे लग्न होणार होते. मात्र त्याआधीच घडलेल्या या हत्येमुळे खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
संकट मोचन परिसरातील रहिवासी सेवानिवृत्त इन्स्पेक्टर सोपाल सिंह यांचा 34 वर्षीय मुलगा मनीष सिंह हा एका खासगी शाळेत शिक्षक होता. पिरो पोलीस स्टेशन हद्दीतील पचमा गावात उद्या त्याचे लग्न होणार होते. मात्र तत्पूर्वीच मनिषवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.
जमिनीच्या वादातून काकानेच पुतण्याचा काटा काढला
सोपल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या भावासोबत त्यांचा जमिनीवरुन वाद सुरू होता. रविवारी सकाळी भाऊ, त्याची पत्नी आणि मुलाने मनीषला लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण करून जखमी केले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी पोहोचत जखमी मुलाला आरा सदर रुग्णालयात दाखल केले. तेथून पाटणा PMCH येथे त्याला रेफर करण्यात आले. मात्र पाटणा येथे नेत असताना वाटेतच मनीषचा मृत्यू झाला.
आरोपींना अटक
घटनेची माहिती आरा नवाडा पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच नवादा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. प्राथमिक तपासात या हत्येचे कारण घरगुती वाद असल्याचे दिसते. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.