फेसबुकवरुन ब्युटी पार्लरवालीशी चॅटिंग, बोगस रॉ एजंटचा पर्दाफाश
स्वत:चं लग्न जमवण्यासाठी एक पठ्ठ्या चक्क ‘रॉ’ एजंट असल्याचं सांगत होता. यातूनच त्याने गिट्टीखदान परिसरातील एका महिलेला आपल्या जाळ्यात अडकवलं.
नागपूर : स्वत:चं लग्न जमवण्यासाठी एक पठ्ठ्या चक्क ‘रॉ’ एजंट असल्याचं सांगत होता. यातूनच त्याने गिट्टीखदान परिसरातील एका महिलेला आपल्या जाळ्यात अडकवलं. 24 तास चाललेल्या त्याच्या ड्राम्यानंतर त्या युवकाचा बोगसपणा उघड झाला आणि नागपूर पोलिसांच्या जीवात जीव आला.
इम्रान खान नूर मोहम्मद खान हा मुंबईतील गोवंडीचा रहिवासी आहे. मुंबई पोलिसांचा पंटर असल्याने त्याला पोलीसांच्या कार्यपद्धतीची चांगली माहिती आहे. त्याच्या मोबाईलमध्ये मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचे फोन नंबर आहेत. इम्रान खान नूर मोहम्मद खान हा गेल्या दोन महिन्यांपासून नागपुरातील गिट्टीखदान परिसरातील एका महिलेशी फेसबूकवर चॅट करायचा. यातूनच सारा प्रकार सुरु झाला.
गिट्टीखदान परिसरातील एका 35 वर्षीय महिलेसोबत त्याची ओळख झाली. ती महिला ब्युटी पार्लर चालवते. तीसुद्धा घटस्फोटित असल्याने ती लग्न करण्यासाठी चांगल्या मुलाच्या शोधात होती. दोन महिन्यापूर्वी तिची इम्रानसोबत फेसबुकवर मैत्री झाली. इम्रानने स्वत:ची ओळख ‘रॉ’ एजंट म्हणून दिली. पाकिस्तानमध्ये आपले येणे-जाणे असल्याने त्याने सीमेपलीकडे अनेक ऑपरेशन केल्याचेही तिला सांगितले. पण नागपुरात आल्यावर तिला शंका आली आणि तिने गिट्टीखदान पोलीसांत धाव घेतली.
‘रॉ’चा एजंट असल्याचं सांगत असल्याने काही काळ नागपूर पोलीसांचीही झोप उडाली. पण तक्रारदार महिलेने गिट्टीखदान पोलीसांत तक्रार केल्यानंतर 24 तासांत त्याचा बोगसपणा उघड झाला. पोलीसांनी इम्रान खान नूर मोहम्मद खानला बेड्या ठोकल्या.
नागपुरात लग्न करण्यासाठी मुलीची फसवणूक करण्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. चार जून रोजी प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीतही असाच प्रकार घडला होता. आता गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीत ‘रॉ’ एजंट सांगून महिलेची फसवणूक झाली. त्याला पोलिसांनी अटकही केलं. पण लग्नासाठी मुलगा शोधताना अशा भामट्यांपासून सावध राहण्याची आज खरी गरज आहे.
गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर