दृश्यम चित्रपट पाहून खूनाचा कट, विश्वास नांगरे पाटलांकडून पर्दाफाश
नाशिक : कधी वास्तव घडलेल्या गुन्ह्यांवर चित्रपट निर्मिती केली जाते, तर कधी चित्रपटांचे अनुकरण करुन गुन्हे घडतात. असाच काहिसा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. नाशिकमध्येही बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट पाहून खूनाचा कट रचल्याचे उघड झाले आहे. आरोपीने दृश्यम चित्रपट पाहून आपल्याच भावाची हत्या केली. मात्र, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या हत्येचा […]
नाशिक : कधी वास्तव घडलेल्या गुन्ह्यांवर चित्रपट निर्मिती केली जाते, तर कधी चित्रपटांचे अनुकरण करुन गुन्हे घडतात. असाच काहिसा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. नाशिकमध्येही बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट पाहून खूनाचा कट रचल्याचे उघड झाले आहे. आरोपीने दृश्यम चित्रपट पाहून आपल्याच भावाची हत्या केली. मात्र, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या हत्येचा पर्दाफाश केला आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिकमधील गुंजाळ मळा या भर वस्तीच्या ठिकाणी शेतातील भूमिगत गटारीच्या 20 फूट खोल ड्रेनेजमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंनदा वाघ यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, हा मृतदेह वाहून आला असावा, असा अंदाज पोलिसांनी लावला. यानंतर पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी ही सर्व माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना दिली. त्यांना हा घातपातच असेल, असा अंदाज आला. त्यांनी तात्काळ तपासी कर्मचाऱ्यांना सर्व परिसराची पाहणी करण्याचे आदेश दिले. मृत विक्की उर्फ टेंभऱ्या कुणाच्या संपर्कात होता का? त्याचीही बारकाईने चौकशी केली. मात्र, पोलिसांना गुन्ह्याचे कोणतेही धागेदोरे हाती लागले नाही.
अखेर खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मृत विक्की उर्फ टेंभऱ्याला त्याचाच चुलत भाऊ रोहन भुजबळने मोटार सायकलवरुन घेऊन गेल्याची माहिती मिळली. या माहितीवरुन चौकशी केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी रोहन पोपटासारखा बोलू लागला. मृत विक्की सतत दमबाजी करायचा आणि कुरापत काढून ठार मारण्याची धमकी द्यायचा. तसेच आईस्क्रीमच्या दुकानावर येऊन फुकट आईस्क्रीम खात असे. त्यामुळे विकीचा काटा काढण्याचे ठरवले, अशी कबुली आरोपी रोहनने दिली. याबाबत आपला मित्र अनिल भोंड यालाही त्याने सांगितले. या दोघांनी रात्री उशिरा विक्कीला दारु पिण्याच्या बहाण्याने बोलावले. मोटार सायकलवर बसवून त्याला रासबिहारी रोडकडून राजमाता लॉन्सच्या दक्षिणेस असलेल्या भूमिगत गटारीच्या चेंबरजवळ नेले. तेथे विक्कीला शुद्ध हरपेपर्यंत दारु पाजली आणि उचलून उघड्या चेंबरमधून खाली टाकले. दृश्यम चित्रपट पाहूनच आपण हा सर्व कट रचल्याचे आरोपी रोहन भुजबळ आणि अनिल भोंड यांनी पोलिसांना सांगितले.
सिनेमातून चांगल्या गोष्टी घेऊन त्याचं अनुकरण करण्याऐवजी आरोपींनी वाईट गोष्टींचे अनुकरण केले. मात्र, त्यांनी जर दृश्यम सिनेमा बघितलाच नसता, तर कदाचित विकीचा जीवही वाचला असता, अशीही चर्चा नागरिक करत आहेत.