दिल्ली जिंकण्यासाठी महाराष्ट्र भाजपची फौज, दहा नेते राजधानीत, पंकजा मुंडेंची दिल्लीत सभा
नितीन गडकरी, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे, हीना गावित, पूनम महाजन, भारती पवार, आशिष शेलार या दिग्गज नेत्यांच्या सभा दिल्लीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून फौज मागवली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे 10 दिग्गज नेते दिल्ली विधानसभेच्या प्रचारात (Mah BJP Leaders in Delhi) उतरणार आहेत.
दिल्लीतील चौका-चौकात महाराष्ट्रातील नेत्यांच्या सभा होणार आहेत. माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आज दिल्लीत तीन सभा होणार आहेत. दक्षिण दिल्लीत तीन सभांना देवेंद्र फडणवीस आज संबोधित करतील.
याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, खासदार रक्षा खडसे, हीना गावित, पूनम महाजन, भारती पवार, आमदार आशिष शेलार या दिग्गज नेत्यांच्या सभा दिल्लीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
पंकजा मुंडे यांनी पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणात भाजपमधील दिग्गज नेत्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर पंकजांवर दिल्लीची जबाबदारी देऊन त्यांच्या नाराजीची धार काहीशी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरोधात 65 जणांचा शड्डू, अरविंद केजरीवालांची संपत्ती…
विशेष म्हणजे स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपचे ज्येष्ठ आणि नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांचाही समावेश आहे. पंकजा मुंडेंप्रमाणेंच खडसेंच्या नाराजीला शांत करण्यासाठी त्यांच्या स्नुषेचा ‘मिशन दिल्ली’त समावेश केल्याचं बोललं जातं. त्यांच्यासोबतच तिकीट नाकारलेले माजी मंत्री विनोद तावडे यांचाही समावेश आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 11 फेब्रुवारीला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.
‘आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचं तख्त राखण्यासाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्र हातातून गेल्यामुळे दिल्लीवर स्वारी करण्यासाठी भाजप उत्सुक आहे. आप आणि काँग्रेस यांचं कडवं आव्हान मोडून काढत दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी भाजपला कसरत (Mah BJP Leaders in Delhi) करावी लागणार आहे.