RTE : आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी 3 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय, 7 हजार 576 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले
शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील बालकांचे प्रवेश प्रक्रियेची मुदत 10 मे 2022 रोजी पर्यंत होती. निवड झालेल्या 90 हजार 685 विद्यार्थ्यांपैकी 62 हजार 155 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.
मुंबई – शिक्षण हक्क (RTE) कायद्यांतर्गत आपल्या मुलांच्या शाळेत प्रवेशाची वाट पाहणाऱ्या पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला 3 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच प्रतीक्षा यादीच्या पहिल्या फेरीमध्ये नावे जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळाला.प्रतीक्षा यादीत एकूण 1,92,098 विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत. तर उपलब्ध जागा 39,727 आहेत. महाराष्ट्र शालेय शिक्षण संचालनालय (Maharashtra School Education Directorate) जे शिक्षण हक्क अंतर्गत 25 टक्के राखीव जागांसाठी केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आयोजित करते, संपूर्ण महाराष्ट्रातील खासगी शाळांमध्ये (private schools) याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे.
प्रवेशासाठी 3 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय
“पालकांनी केवळ एसएमएस मिळवण्यावर अवलंबून राहू नये. तर त्यांच्या प्रभागात जागा दिली आहे, की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी आरटीई प्रवेश पोर्टल तपासले पाहिजे. आरटीई प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित शाळेत वाटप केलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करण्यासाठी त्यांच्याकडे 27 मे पर्यंत वेळ असेल,” असे परिपत्रकात म्हटले होते. मात्र अनेक पालकांना प्रवेश घेण्यासाठी शाळांमध्ये जाण्यात अडचणी येत असल्याने प्रतीक्षा यादीतील पहिल्या फेरीतील बालकांच्या प्रवेशासाठी 3 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी घेतला आहे.
प्रतीक्षा यादीतील 7 हजार 576 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले
शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील बालकांचे प्रवेश प्रक्रियेची मुदत 10 मे 2022 रोजी पर्यंत होती. निवड झालेल्या 90 हजार 685 विद्यार्थ्यांपैकी 62 हजार 155 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. याआधी दोन वेळा मुदतवाढ देखील देण्यात आली होती. त्यामुळे प्रतीक्षा यादीसाठी 39 हजार 751 जागा शिल्लक राहिल्या होत्या.
त्यानंतर 19 ते 27 मेपर्यंत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला सुरुवात झाली. यावेळी प्रतीक्षा यादीतील 7 हजार 576 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.