HSC And SSC Exam | परीक्षा ऑफलाईन आणि ठरवलेल्या वेळेतच का होणार, शरद गोसावी यांनी नेमकं काय सांगितलं ?
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तसेच राज्यात तब्बल 31 लाख विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान पुरवणे शक्य होणार नाही, त्यामुळे ऑफलाईन परीक्षांचे आयोजन करण्यात येत आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
पुणे : मागील काही दिवसांपासून दहावी आणि बारावीच्या (10 And 12 Exam) परीक्षांवरुन मोठं राजकारण तापलंय. विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईनच व्हाव्यात अशी भूमिका घेतली आहे. या मागणीला घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारने परीक्षा ऑफलाईनच होणार हे स्पष्टपणे सांगितलं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलीय. राज्यात तब्बल 31 लाख विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान पुरवणे शक्य होणार नाही, त्यामुळे ऑफलाईन परीक्षांचे आयोजन करण्यात येत आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ते पुण्यात (Pune) बोलत होते.
तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध करणे अशक्य
परीक्षा ऑफलाईनच आणि वेळेवर का होणार याबाबत गोसावी यांनी माहिती दिली आहे. “परीक्षेचं स्वरुप लक्षात घेतलं तर आपली प्रश्नपत्रिका ही वस्तूनिष्ठ, लघुत्तर आणि दोर्घोत्तर असते. दहावी आणि बारावी अशा दोन्ही वर्गाची परीक्षा एकूण 31 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तसेच आपल्या प्रश्नपत्रिकेची संख्या आणि माध्यमांची संख्या लक्षात घेता एवढ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुविधा उपलब्ध करणे शक्य नाही. त्यामुळे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करणे शक्य नाही,” असे गोसावी यांनी सांगितले.
परीक्षेची वेळ वाढवली, कोरोना नियम पाळले जाणार
दरम्यान, सध्याची कोरोनास्थिती लक्षात घेता शिक्षण मंडळाने परीक्षेच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. बोर्डाने परीक्षेचा वेळ वाढवला आहे. तसेच विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून वर्गात झिगझॅग पद्धतीने बसवले जाणार आहे. एका वर्गात 25 पेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जाणार नाहीत. ज्या शाळेत 15 पेक्षा कमी विद्यार्थी असतात तिथं जवळच्या शाळेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यात येईल. 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं जास्त वेळ देण्यात येईल. तर 70 ते 100 गुणांच्या परीक्षांसाठी अर्धा तास अधिकचा देण्यात येणार आहे. परीक्षेचा पेपर 10.30 वाजता सुरु होईल. विद्यार्थ्यांच्या हातात 10.20 आणि दुपारच्या सत्रात 2.50 वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येईल, अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली.
इतर बातम्या :
BMC BUDGET: मुंबई महापालिकेचा डिजीटल शिक्षणावर भर, विद्यार्थ्यांना मसूरडाळ, हरभरे आणि तांदूळही देणार
Priyanka Chopra : आई झाल्यानंतर प्रियांका चोप्राचा पहिला फोटो, पोस्ट शेअर करत म्हणाली…