IIT मुंबईत व्हेज टेबलावर नॉन व्हेज खाणाऱ्या विद्यार्थ्यांना इतक्या हजाराचा दंड
IIT | प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्थांमध्ये IIT मुंबईचा समावेश होतो. याच IIT मुंबईत आता शाकाहारी-मांसाहारी वाद रंगला आहे. भोजनालय समितीने नियम मोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठी कारवाई केली आहे. येणाऱ्या दिवसात हा वाद आणखी वाढू शकतो.
मुंबई : देशातील प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्थांमध्ये मोडणाऱ्या IIT मुंबईत शाकाहारी-मांसाहारीचा वाद सुरु आहे. 12,13 आणि 14 नंबरच्या वसतिगृहातील भोजनालय समितीने बेशिस्त वर्तन आणि भोजनालयाचे नियम मोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शाकाहारींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेवर गुरुवारी काही विद्यार्थ्यांनी मांसाहार केला. भोजनालयात जे, शाकाहारी-मांसाहारी विभाजन करण्यात आलय, त्याला विरोध म्हणून काही विद्यार्थ्यांनी मुद्दामून शाकाहारी जागेवर मांसाहार केला. अशा प्रकारच विरोध प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 12 नंबरच्या हॉस्टेलमधील एका विद्यार्थ्याला दंड ठोठावण्यात आलाय. ओळख पटल्यानंतर दोघांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. भोजनालय समितीने कार्यवृत्त मंजूर केलय. त्यात हा उल्लेख आहे.
भोजनालय समितीची बैठक झाली, त्यात चार प्राध्यापक, वॉर्डन आणि तीन विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. विद्यार्थ्यांच बेशिस्त वर्तन आणि भोजनालय नियमांच उल्लंघन यावर चर्चा करण्यासाठी समितीची ही बैठक झाली. 28 सप्टेंबरच्या रात्री डीनरच्यावेळी काही विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक नियम मोडले. याचे पुरावे आहेत, असं बैठकीच्या कार्यवृत्तात म्हटलं आहे. या कृतीला भोजनालयातील शांतता आणि सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न ठरवण्यात आला आहे. शाकाहारी किती टेबल राखीव?
अन्य दोन विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी समितीने तीन वसतिगृहाच्या विद्यार्थी प्रतिनिधींकडे मदत मागितली आहे. समितीकडून विद्यार्थ्यांना भोजनालयात शांतता टिकवून ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. तीन वसतिगृहाचं मिळून एक कॉमन भोजनालय आहे. त्यातील सहा टेबल्स शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याच्या भोजनालय समितीच्या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. मागच्या आठवड्यात विद्यार्थ्यांना याची कल्पना देण्यात आली. त्यावेळी कॅम्पसमध्ये भेदभाव वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. शाकाहारींसाठी राखीव असलेल्या जागेत मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.