सावखेड्याच्या जिल्हा परिषद शाळेची जळगावात चर्चा, ‘ओट्यावर शाळा’ उपक्रमाद्वारे शिक्षणाची गाडी सुसाट
जि.प.च्या अनेक शाळा बंद असताना, जळगाव तालुक्यातील सावखेडा खु. येथील शिक्षकांनी गावात ‘ओट्यावर शाळा’ हा अभिनव उपक्रम राबवून शिक्षणाचा नवा पर्याय उभा केला आहे.
जळगाव: तालुक्यात सावखेडा गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. मोठ्या शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा नवा पर्याय उभा केलाय. ग्रामीण भागात व जिल्हा परिषदेच्या शाळा व शिक्षकांना हा ऑनलाईनचा पर्याय राबविण्यास मोठी अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. जि.प.च्या अनेक शाळा बंद असताना, जळगाव तालुक्यातील सावखेडा खु. येथील शिक्षकांनी गावात ‘ओट्यावर शाळा’ हा अभिनव उपक्रम राबवून शिक्षणाचा नवा पर्याय उभा केला आहे.
ओट्यावर शाळा उपक्रमामुळं विद्यार्थी आनंदित
यामुळे विद्यार्थी नेहमी शिक्षकांच्या देखरेखीत राहत असून, कोरोनाच्या काळात घराबाहेर देखील जात नाहीत आणि शिक्षणाला देखील कोणताही ‘ब्रेक’ देखील लागत नाही. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाला मुख्याध्यापक अरुण चौधरी, प्रवीण चौधरी व किरण सपकाळे या शिक्षकांनी चांगल्याप्रकारे राबवून इतर शाळांसाठी देखील नवा पर्याय उभा केला आहे. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची विद्यार्थी देखील मजा घेत आहेत.
ओट्यावर शाळा संकल्पना नेमकी काय?
जळगाव तालुक्यातील सावखेडा खु. जि.प.शाळेत एकूण 3 शिक्षक आहेत. गाव लहानसे व येथील नागरिकांचा व्यवसाय मजुरी व शेती हाच आहे. तसेच शहरापासून गाव दुर असल्याने इंटरनेटची समस्या देखील नेहमीच असते, अशा परिस्थितीत मोबाईलवर ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्यास अनेक अडथळे येतात. त्यामुळे गावातील जि.प.शाळेतील प्रत्येक विद्यार्थी सकाळी 10 वाजता आपआपल्या घरातील ओट्यावर येवून आपले दप्तर घेवून बसत असतो. तीन्ही शिक्षक दररोज जळगावहूनच प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठीचा दररोजचा अभ्यास क्रमाची झेरॉक्स काढून काही प्रश्नावली घेवून येतात. नंतर तीच प्रश्नावली गावातील प्रत्येक विद्यार्थ्याचा ओट्यापर्यंत पोहचवून विद्यार्थ्यांना दिली जाते. परत तासानंतर शिक्षक पुन्हा विद्यार्थ्यांकडे येतात. ओट्यावर बसून प्रत्येक विद्यार्थ्यांला भेटून त्याने सोडविलेले उत्तरे तपासून त्याने केलेल्या चुकांचे निरसन करत असतात.
सावखेड्याची पंचक्रोशीत चर्चा
अनेक खासगी संस्था व इतर सरकारी शाळा देखील कोरोनाचे कारण देत वर्षभरापासून बंद असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण देखील थांबविले आहे. मात्र, सावखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमाची चर्चा सावखेड्याचा पूर्ण पंचक्रोशीत होत आहेत. जि.प.शाळेतील शिक्षक एवढे प्रयत्न करत असताना, सावखेडा गावातील इतर उच्चशिक्षीत तरुण देखील या उपक्रमाशी जुडले असून, ओट्यावर जावून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही ‘ओट्यावरची शाळा’ दररोज भरत असते, असं शाळेचे मुख्याध्यापक अरुणकुमार चौधरी यांनी सांगितलं आहे.
इतर बातम्या:
ऑलिंपिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व, मात्र साताऱ्यात तिरंदाजाला जेसीबीने घर पाडण्याची धमकी
Jalgaon Savkheda ZP school started otyavar shala during corona times to start education of students