मुंबई: मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल (Iqbal Chahal) यांनी मंगळवारी द इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राशी बोलताना मुंबईतील कोरोना स्थिती (Mumbai Corona Update) आणि शाळा पुन्हा सुरू (School Reopen) करण्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढलेली होती. मात्र, त्यानंतर अलीकडच्या काही दिवसात रुग्ण संख्या कमी झाल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा 27 जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती आयुक्त चहल यांनी दिली. इकबाल चहल यांनी यासाठी मुंबईतील जानेवारी महिन्यातील आकडेवारीचा दाखला देखील दिला.10 जानेवारीच्या दरम्यान मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळत होते. मात्र, त्यानंतर रुग्णसंख्या घटल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथील रुग्णसंख्या देखील घटत असल्याचं इकबाल चहल यांनी सांगितलं.
जानेवारीच्या 10 तारखेला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या जास्त होती. त्यानंतर कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहे. 26 जानेवारीपर्यंत मुंबईत रुग्णसंख्या 1000 ते 2000 या दरम्यान येईल. त्यामुळे 27 जानेवारीपासून शाळा सुरू करण्यासंबंधी नियोजन असल्याचे इकबाल चहल यांनी स्पष्ट केलं.
7 जानेवारीला मुंबईत सर्वाधिक 20971 रुग्ण संख्या आढळून आली होती तर दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक रुग्ण संख्येची आकडेवारी 11573 होती. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आणि मृत्युदर याचे प्रमाण कमी असल्याचे देखील इकबाल चहल यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी 10661 रविवारी 7195, सोमवारी 5956, आणि मंगळवारी 6149 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्हीटी रेट देखील खाली आला असून 6 जानेवारीला 29.9 टक्के असणारा मंगळवारी 12.9 टक्क्यांवर आला होता. फक्त मुंबईतच रुग्णसंख्या घटत आहे असं नाही तर कोलकत्ता आणि दिल्लीमध्येही रुग्ण संख्या कमी होत असल्याचं चहल यांनी सांगितलं आहे. याशिवाय चेन्नई मध्ये देखील रुग्ण संख्या कमी होत आहे.
Nashik Election | 6 नगरपंचायतींचा आज निकाल; 312 उमेदवारांची धडधड वाढली, कोण मारणार बाजी?
Mumbai BMC Commissioner Iqbal Chahal said they have plan to reopen school from 27 January due to fall in corona cases