नवी दिल्ली : राज्यासह देशभरात नीट पीजी (NEET PG) परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि या परीक्षेला बसणाऱ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. आता तर थेट इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबत सरकारला पत्र लिहीत तशी विनंती केली. IMA ने आपल्या पत्रामध्ये नीट पीजीची परीक्षेचं आयोजन 21 मे ऐवजी नंतर केलं जावं अशी मागणी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहीत आयएमएने ही मागणी केली आहे. या पत्रातून आयएमएनं आपली मागणी कशी योग्य आहे, याचा खुलासाही केलेला आहे. नीट पीजी परीक्षेला (NEET PG Exam) बसू इच्छिणाऱ्यांना सध्याच्या घडीला हातात फार वेळ शिल्लक राहिलेला नाही. ही परीक्षा 21 मे रोजी घेतली जावी, असं ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर मे 21 रोजी नीट पीजी 2022 साठीची परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र अनेकांनी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. कारण 2021 च्या नीट पीजी राऊंडमध्ये ज्यांना अपयश येईल, त्यांनाही 2022च्या परीक्षेला पुन्हा बसता येण्याची संधी मिळावी, यासाठी हा निर्णय घेतला जावा, अशी मागणी केली जातेय. तसंच सध्याच्या घडीला नीट पीजी 2022 परीक्षेसाठी पुरेसा वेळही विद्यार्थ्यांना (Medical Students) मिळू शकलेला नाही, असंही आयएमएने म्हटलंय.
खरंतर कोरोना काळात 10 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना कोविड ड्यूटी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांची इंटर्नशिप वेळत पूर्ण होऊ शकी नाही. हे सर्व विद्यार्थी पात्र असूनही वेळेत इंटर्नशिप पूर्ण न केल्यानं त्यांना परीक्षा देता न येणं दुर्भाग्यपूर्ण असल्याचं आयएमएनं आपल्या पत्रात म्हटलंय. त्यामुळे परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Indian Medical Association (IMA) wrote a letter to Union Health Minister Mansukh Mandaviya to “reschedule the NEET PG exam scheduled for 21st May 2022” pic.twitter.com/Y9gFUImrgM
— ANI (@ANI) May 12, 2022
21 मे रोजी घेण्यात येणारी ही परीक्षा पुढे ढकलली गेली, तर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. एकतर परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना पुरेसा वेळ मिळेल आणि विद्यार्थ्यांची इंटर्नशिपही पूर्ण होईल, असा विश्वास आयएमएनं व्यक्त केलाय.
दरम्यान, या आधीही विद्यार्थ्यांच्या संघटनांनी नीट पीजी (NEET PG) परीक्षा पुढे ढकलणयाची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील एक पत्र विद्यार्थ्यांच्या संघटनेनं लिहिलेलं होतं. मात्र याबाबत कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नीट पीजी परीक्षेच्या तारखा न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.