एसटीच्या संपाचा परिणाम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पीएच.डीच्या मुलाखती लांबणीवर
महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरु आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रावरही एसटी संपाचा परिणाम जाणवत आहे.
सोलापूर: महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरु आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रावरही एसटी संपाचा परिणाम जाणवत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं अनेक ठिकाणच्या परीक्षांवर परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पीएच.डीच्या मुलाखती दुसऱ्यांदा लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठ प्रशासनानं मूळ वेळापत्रकात बदल करत 23 नोव्हेंबरपासून मुलाखतींचं आयोजन केलं होतं. मात्र, आणखी एकदा मुलाखती लांबणीवर टाकल्या आहेत. आता 30 नोव्हेंबरपासून मुलाखती होणार आहेत.
मुलाखती पुन्हा लांबणीवर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या पीएचडी प्रवेशासाठीची मौखिक परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणं 16 ते 22 नोव्हेंबरच्या दरम्यान परीक्षा होणार होत्या. मात्र, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 23 ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान परीक्षा घेण्याचं निश्चित केलं होतं. अद्याप एसटी कर्मचाऱ्यांचा संप न मिटल्यानं पुन्हा एकदा नव्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
नव्या तारखा जाहीर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीनं पीएच.डी. मौखिक परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा अद्याप संप सुरू असल्यामुळे मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखतींचा कार्यक्रम आता 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर च्या दरम्यान होणार आहे, असं विद्यापीठ प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
नवं वेळापत्रक कुठं उपलब्ध होणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पीएच.डीच्या मुलाखती दुसऱ्यांदा लांबणीवर गेल्या आहेत. विद्यार्थ्यांना नवं वेळापत्रक विद्यापीठाची वेबसाईट http://www.sus.ac.in/ वर पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांनी यासंदर्भातील अपडेटसाठी वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.
एसटी संपामुळं शिक्षण क्षेत्रावर परिणाम
कोरोना विषाणू संसर्ग असल्यानं गेल्या दीड वर्षापासून शाळा आणि महाविद्यालय बंद होती. महाराष्ट्रात आता पूर्णक्षमतेनं महाविद्यालय आणि शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील सुरु आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरायचे आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्यानं विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. विद्यार्थ्यांना अतिरिक्त रक्कम खर्च करुन महाविद्यालयापर्यंत पोहोचावं लागत आहे.
इतर बातम्या:
HSC SSC Exam : दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
Punyashlok Ahilyadevi Holkar University Solapur postpone interview schedule of PHD