RTE Admission 2023- 24 : आरटीई प्रवेशाला सुरुवात, शेवटची तारीख कधी, पाहा तुमच्या मुलाचा नंबर कसा चेक करणार? जाणून घ्या
RTE Admission 2023- 24 : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यात अनेक पालकांनी आपल्या पाल्यासाठी अर्ज केले आहेत. आता यादी जाहीर झाली असून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. पण प्रक्रिया नेमकी कशी असते ते जाणून घ्या.
मुंबई : तुम्ही आतापर्यंत आरटीई शब्द बऱ्याचदा ऐकला असेल पण त्याचा नेमका अर्थ प्रत्येकालाच माहिती असेल असं नाही. आरटीईचा फुल फॉर्म Right To Education म्हणजेच शिक्षणाचा अधिकार असा होय. हा कायदा शिक्षण हक्क कायदा 2009 नावाने ओळखला जातो. भारतीय संसदेने 4 ऑगस्ट 2009 रोजी हा कायदा पारित केला आहे. आता या कायद्यांतर्गत महाराष्ट्रात 2023-24 सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. चला जाणून घेऊयात प्रवेश प्रक्रिया आणि शेवटची तारीख काय आहे? ते
5 एप्रिल 2023 रोजी लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची नावं जाहीर झाल्यानंतर 12 एप्रिल 2023 रोजी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस प्राप्त झाला आहे. परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी.
महाराष्ट्रात आरटीई अंतर्गत 25 टक्के राखीव जागांसाठी अर्ज करण्यात आले होते. यासाठी अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया rte25admission.maharashtra.gov.in वर पार पडली. आता निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्र तपासण्याची मुदत 13 एप्रिल 2023 पासून 25 एप्रिल 2023 पर्यंत आहे.
आरटीई अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी काय करावे?
- https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर verification committee या tab वर click करावे आणि शाळेच्या जवळील पडताळणी केंद्रावर जावे.
- आरटीई पोर्टलवरील हमीपत्र , एलॉटमेंट लेटर (Allotment Letter) आणि अर्जात नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित/मूळ प्रती घेऊन पडताळणी समितीकडे जावे.
- सर्व कागदपत्रांच्या 2 प्रती काढून पडताळणी समितीकडे सादर कराव्यात .
- पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
- पडताळणी समितीने कागदपत्रे तपासल्यानंतर योग्य असल्याचा शेरा दिल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होणार आहे. कागदपत्रांअभावी पडताळणी समितीने अपात्र शेरा दिल्यास संबंधित विद्यार्थ्याला प्रवेश नाकारण्यात येईल.
- प्रवेशपत्र आणि पडताळणी केलेली कागदपत्रे घेऊन पालकांना निवडलेल्या शाळांमध्ये पाठविण्यात येईल. -निवडलेली शाळा ही पालकांकडून कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे मागणार नाहीत किंवा प्रवेश नाकारणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
- शाळेमध्ये प्रत्यक्ष प्रवेश 25 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान मिळणार आहे.
किती अर्ज दाखल झाले आणि प्रतीक्षा यादी
संपूर्ण महाराष्ट्रात आरटीई अंतर्ग 8823 शाळा येतात. या शाळांमध्ये 1,01,846 जागा रिक्त आहेत. तर यासाठी एकूण अर्ज 3,64,413 जणांनी केले होते. त्यापैकी 94,700 जणांची निवड झाली आहे. 81129 विद्यार्थ्यांची नाव प्रतीक्षा यादीत आहेत.