अमरावती : परीक्षा ऑनलाइन (Online Exams) घेण्यात याव्यात यासाठी अमरावती विद्यापीठावर एनएसयुआय (NSUI) ने मोर्चा काढलाय. शेकडोंच्या संख्येत विद्यार्थी (Students) आणि कार्यकर्ते संत गाडगेबाबा बाबा अमरावती विद्यापीठात आंदोलन करतायत. मोर्चात प्रदेशाध्यक्ष आमिर शेख आणि मंत्री यशोमती ठाकूर यांची कन्या आकांक्षा ठाकूर हिचा देखील सहभाग आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून येतोय.
राज्य शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियम हटवले असल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. यानंतर विद्यापीठाच्या परीक्षादेखील ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, असा सूर व्यक्त होत होता. परंतु काही विद्यार्थी संघटनांनी याला आक्षेप घेतला. विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय सुटली असल्याने किमान यावर्षीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र कुलगुरू डॉ. दिलीप वानखेडे यांनी परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. विद्वत्त परिषदेतील निर्णयाने यावर शिक्कामोर्तब देखील झाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा या सत्रात ऑफलाइन होणार आहेत. परंतु विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइनच घेण्यात याव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.