गुरुजी ही मुलं शिक्षणाची भूकेली, शाळेच्या दाराला लटकून प्राण डोळ्यात साठवून वाट पाहतायत, या ना गुरुजी
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा चांगला आहे, मराठी वाचवण्यात आणि वाढवण्यात जिल्हा परिषद शाळांचा मोलाचा वाटा आहे, असं एका बाजूला म्हटलं जात असलं, तरी
जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा चांगला आहे, मराठी वाचवण्यात आणि वाढवण्यात जिल्हा परिषद शाळांचा मोलाचा वाटा आहे, असं एका बाजूला म्हटलं जात असलं, तरी जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा काही शिक्षकांमुळे खालावत चालला आहे. तर दुसरीकडे असे बोटावर मोजण्या इतकेच लोक आहेत, जे शिस्त पाळत नाहीत, आणि संपूर्ण जिल्हा परिषद शाळांचं नाव खराब होतं. तर काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हे गावावर राहत नाहीत, तालुक्यावरुन हे शिक्षक ये-जा करत असतात, सकाळी शाळेला उशीरा पोहोचत असल्याने मुलच कुलूप लावलेल्या गेटजवळ बसून शिक्षकांची वाट पाहतात. जिल्ह्यातील अनेक हायस्कूलमध्ये उशीरा येणाऱ्या आणि लवकर जाणाऱ्या शिक्षकांचा आकडाही काही कमी नाही.
जळगाव जिल्ह्यातील केंद्रीय जिल्हा परिषद शाळा कजगाव तालुका भडगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे. विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सकाळी अकरा वाजूनही शिक्षक शाळेत पोहोचत नाहीत, मुलं शाळेच्या गेटला लटकून शिक्षकांची वाट पाहतात.
गेटला लागूनच वाहनांच्या रहदारीचा रस्ता असल्याने पालकांमध्ये पाल्यांचं कधीही काहीही होवू शकतं अशी चिंता आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षकांची हजेरी बायोमॅट्रिक पद्धतीनी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पालकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. काही चांगल्या शिक्षकांनाही या गोष्टीचा त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे. उशीरा शाळेत पोहोचणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे, यामुळे काही लोकांनी आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करत असल्याचं चित्र आहे. यावर गंभीरतेने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात काही शाळांनी आपला नावलौकिक कायम ठेवत सर्वोत्तम ज्ञानदानाचं काम सुरुच ठेवलं आहे, पण अशा प्रकारच्या शाळा आता बोटावर मोजण्याएवढ्याच आहेत. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या घटणे यामागे, ज्या प्रमाणात शिस्त राबवायला हवी होती, त्यावर जोर न दिला गेल्याने शिक्षकांमध्ये भीती निर्माण झालेली नाही.
काही शाळांमध्ये तर शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे, त्यामुळे देखील शिक्षणाचा दर्जा खालावत चालला असल्याची तक्रार आहे. पुढील शिक्षक भरती होवून, शिक्षक जोपर्यंत कामावर रुजू होत नाहीत, तोपर्यंत ही शिक्षकांची कमतरता भासत राहणार आहे.
राज्यात काही जिल्हा परिषद शिक्षकांनी मोलाची कामगिरी करुन दाखवली आहे, लहान मुलांमध्ये सहज फिरणारे, हसणारे, नृत्य करुन शिक्षणाचे बोध देणारे शिक्षकंही आहेत. पण काही जण शाळेत यायला खूप उशीर करतात आणि शाळा सुटण्याच्या वेळे आधी घरी निघण्याची घाई करतात, अशा शिक्षकांमुळे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणावर सजग पालकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.