Parenting : लहान वयातच तुमचं मूल प्रेमात पडलयं ? पालकांनी चुकूनही करू नयेत ‘ या ‘ चुका !
आपला मुलगा अथवा मुलगी कोणाच्या प्रेमात पडले आहेत, ही गोष्ट पचवणं भारतीय पालकांसाठी खूप कठीण ठरते. आणि जर मुलगा वा मुलगी लहान असतील तर ही बाब अजूनच गंभीर होते. मुलांच्या रिलेशनशिपबाबत कळल्यानंतर बहुतांश पालकांना खूप राग येतो.
मुंबई : काही वर्षांपूर्वी बंगळुरू येथे एक घटना घडली होती. जिथे एका 15 वर्षांच्या मुलीने तिच्या 19 वर्षांच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने आपल्या वडिलांची हत्या केली होती. या खुनाचे कारण विचारले असता, त्या मुलीने सांगितले की तिच्या वडिलांना तिचे प्रेमसंबंध बिलकुल आवडले नव्हते आणि याबाबतीत समजल्यानंतर त्यांनी तिला खूप मारहाण केली व तिचा फोनही काढून घेतला होता. त्यामुळे आपले स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी त्या मुलीने तिच्या बॉयफ्रेंडसह मिळून पित्याचा खून केला. या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र गंभीर चर्चा सुरू झाली होती. अशी अनेक प्रकरणेही समोर येतात, जिथे पालकांनी लागू केलेल्या बंधनांमुळे तरूण मुलं-मुली आत्महत्येसारखे मोठे पाऊलही उचलतात. अशा वेळी असा प्रश्न उपस्थित होतो की, तरुण मुलांच्या प्रेमसंबंधांबाबत समजल्यानंतर पालकांनी ही परिस्थिती कशी हाताळावी ? सामान्यत: भारतीय कुटुंबांमध्ये जेव्हा आई-वडिलांना (parents) मुलांच्या रिलेशनशिपबाबत किंवा प्रेमसंबंधांबाबत (kids romantic relationship) कळते तेव्हा, त्यांच्या रागामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडते. मात्र अशा वेळी हे समजून घेणे गरजेचे आहे की, तुमची मुलं मोठी होत आहेत (teenager kids) आणि दरवेळेस तुम्ही त्यांना भीती घालून, धमकी देऊन, घाबरवून, तुमचं म्हणणं ऐकायला भाग पाडू शकत नाही.
किशोरावस्था किंवा वयात येणे हा एक असा काळ असतो, जेव्हा मुला-मुलींच्या शरीरात बरेच बदल होताना दिसतात. अशा परिस्थितीत भिन्न-लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे ही खूप साहजिक गोष्ट आहे. अशा वेळी पालकांनी त्यांच्या मुला-मुलींची मनस्थिती समजून घेऊन त्यांना प्रेमाने समजावले पाहिजे. तुमच्या मुलांनी तुम्हाला सर्व गोष्टी विश्वासाने सांगाव्यात, शेअर कराव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हालाही त्यांच्या मनात आपण सर्व एकाच टीममध्ये आहोत, हा विश्वास निर्माण करावा लागेल. यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. त्या कोणत्या हे जाणून घेऊया –
जेव्हा आई-वडील त्यांच्या मुलांशी पालकाच्या भूमिकेतून बोलतात, तेव्हा मुलं त्यांच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवून ठेवण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेस पालकांना त्यांच्या मुलांच्या रिलेशनशिपबाबत कळते, तेव्हा त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येतात. हे सर्व कसं झालं, असं वागण्याची तुमची हिम्मत कशी झाली, हे सगळं इतर लोकांना कळलं तर ते काय म्हणतील, तुम्ही कुटुंबाचे नाव धुळीत मिळवले, अशा पद्धतीचे विचार त्यांना (पालकांना) त्रास देऊ लागतात. या सर्व विचारांमुळे आई-वडिलांना खूप राग येतो आणि ते मुलांवर, त्यांच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू करतात. त्यापायी मुलांना कधीकधी शिक्षाही दतात. मात्र अशा वागण्यामुळे मुलं पालकांपासून मनाने दूर होतात आणि गोष्टी लपवायला सुरूवात करतात.
मुलांच्या रिलेशनशिपशी कसे करावे डील ?
अशा सर्व प्रकरणांत मुलांना पालकांच्या पाठिंब्याची खूप गरज असते. मात्र पालकांच्या रागामुळे आणि तुटक वागणुकीमुळे मुलं त्यांच्यापासून दूर होतात. मुलांच्या रिलेशनशिपबाबत समजल्यानंतर ही परिस्थिती कशी हाताळावी आणि मुलांशी संवाद कसा साधावा हे जाणून घेऊया.
मुलांच्या रिलेशनशिपला मंजूरी द्या – जेव्हा पालकांना मुलांच्या रिलेशनशिपबाबत समजते, तेव्हा त्यांना या नात्याला मंजूरी देणे खूप कठीणे होते. अशावेळी सरळ नकार देण्यापेक्षा काही गोष्टी कराव्यात – – जर तुम्हाला मुलांच्या नात्याबद्दल त्रास होत असेल तर त्यासंदर्भात कोणाशी तर बोलावे, मन मोकळं करावे. – सर्वप्रथम तुमचं डोकं शांत ठेवा आणि याबद्दल शांतपणे विचार करण्याचा प्रयत्न करा. – मुलांच्या नात्याबद्दल कळल्यावर मुलांवर राग काढण्यापेक्षा आधी आपल्या जोडीदाराशी चर्चा करा.
मुलांच्या भावना समजून घ्या – वयात येताना मुलांच्या शरीरात होणारे बदल पालकांनी समजून घेणे हे आवश्यक आहे. पण फक्त शारीरिक बदल नव्हे तर मानसिक बदलांबाबतही जाणून घ्यावे व ते समजून घ्यावे. त्यामुळे मुलांशी बोलून त्यांच्या भावना समजून घ्या. अशावेळी मुलांच्या मनात बऱ्याच गोष्टी सुरू असतात, ज्यामुळे त्यांना अधिक इमोशनल वाटत असते. किशोरावस्थेत मुलांना पालकांशिवाय आपल्या स्वातंत्र्याचा आनंद लुटायचा असतो. या वयात ते नवनवे मित्र बनवतात आणि नव्या गोष्टींचा अनुभव घेण्यास उत्सुक असतात. त्यामुळे या वयात त्यांचे पालक बनून नव्हे तर त्यांचा मित्र बनून त्यांच्याशी बोला, संवाद साधा. वयात येताना मुलांना काही हार्मोनल बदलांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीत ती काही वेगळं वागत असतील तर किंवा प्रतिक्रिया देत असतील तर त्यांच्यावर रागावू नका. तसेच मुलांवर लक्ष ठेवताना त्यांना त्यांची प्रायव्हसी मिळावी, हेही लक्षात ठेवा. त्यांच्याकडून एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी दबाव टाकू नका.
प्रेम व नातं याबद्दल मुलांशी चर्चा करा –
बऱ्याच वेळेस पालकांना मुलांशी या विषयावर चर्चा करणे कठीण जाते. मात्र तुमच्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडून मुलांशी खुलेपणाने या विषयावर बोलणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्याशी सर्व गोष्टी खुलेपणाने बोलाव्यात अशी मुलांची इच्छा असते. तुम्ही तसे वागलात तर मुलं तुमचं नीट ऐकतील. संवाद साधल्याने सर्व समस्यांवर उत्तर मिळू शकते.
या टीप्सद्वारे तारूण्य आणि रिलेशनशीपशी पालक डील करू शकतात –
– जर मुलांच्या नात्याबद्दल तुम्हाला काही कळले तर त्यांच्याशी या विषयावर बोला. लगेच त्यांना कठोर शिक्षा देऊ नका.
– आपल्या मुलांना मुलगा व मुलगी या दोघांशी मैत्री करण्यास प्रोत्साहन द्यावे. कोणताही भेद करू नये.
– रोमान्स, सेक्शुअल ॲट्रॅक्शन इत्यादी गोष्टींबाबत मुलांशी बोलण्यात तुम्हाला संकोच अथवा अडचण वाटत असेल तर तुम्ही त्यांना काऊन्सिलरकडे घेऊन जाऊ शकता.
– तुमच्या मुलांच्या मित्र-मैत्रिणींबद्दल माहिती ठेवा. त्यांना वेळोवेळी घरी बोलवा, त्यांच्याशी संपर्कात रहा.