TET Exam Scam : टीईटी परीक्षेतील घोटाळ्यात लाखो रुपये गोळा करण्याऱ्या 3 एजंटाना बेड्या, पुणे पोलिसांची कारवाई
टीईटी परीक्षेत घोटाळा करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांना, एजंट आणि परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या जीएस. सॉफ्टवेअरच्या बड्या लोकांना अटक करण्यात आलीय.
पुणे : महराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी (TET exam Scam) रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पुणे सायबर पोलिसांना (Pune Cyber Police) आरोग्य भरती परीक्षेचा तपास करताना टीईटी परीक्षेतील घोटाळ्याची लिंक लागली होती. त्यानंतर टीईटी परीक्षेत घोटाळा करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांना, एजंट आणि परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या जीएस. सॉफ्टवेअरच्या बड्या लोकांना अटक करण्यात आलीय. टीईटी परीक्षा घोटाळ्यासह म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी तीन दलालांना अटक केलीय. संबंधित एजंटांनी उमेदवारांकडून कोटय़वधींची माया गोळा करून वाटून घेतल्याचे उघड झालं आहे. पुणे पोलिसांनी नाशिक, बुलडाणा आणि लातूर परिसरात छापे मारून दलालांना अटक केली आहे. मुकुंदा सूर्यवंशी, कलीम खान, जमाल पठाण अशी अटक करण्यात आलेल्या एजंटांची नावं आहेत.
आर्थिक गैरव्यवहार समोर येणार
पुणे पोलिसांच्या सायबर विभागानं नाशिक, बुलढाणा, लातूर परिसरात छापे मारून दलालांना अटक केलीय. त्यामुळे टीईटीसह म्हाडा पेपर फुटीप्रकरणातील आणखी आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे. मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी (वय 33, रा. नाशिक), कलीम गुलफेर खान (वय 52, रा. बुलढाणा), जमाल इब्राहिम पठाण (वय 40, रा. लातूर) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत.
मुकुंदानं लाखो रुपये गोळा केले
टीईटी 2018 मध्ये आरोपी मुकुंदा सूर्यवंशी याने अपात्र उमेदवारांना पात्र करण्याचे आमिष दाखवून तब्बल 80 लाख रुपये एजंट हरकळ बंधूंना दिल्याचे सांगितलं आहे. तर, त्याशिवाय 2019 च्या टीईटी परीक्षेत 1 कोटींवर रक्कम पोहोच केली आहे.
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील पैशाचं वाटप कसं
डॉ.प्रीतिश देशमुख आणि अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरून अश्विनकुमार शिवकुमार याला 5 कोटी 37 लाख रुपये देण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. तर, या पाच कोटी रुपयांपैकी 2 कोटी रुपये जीएस सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याला देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या तुकाराम सुपे आणि सुखदेव डेरे यांना देखील पैसे देण्यात आल्याचं समोर आलंय.
पैसे कुणी गोळा केले
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलडाणा जिल्ह्यातील पाच एजंटाकडून हे पैसे जमा केले होते.त्यानंतर डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून ते अश्विनीकुमार याला देण्यात आले.
इतर बातम्या:
सोलापुरात गुलाल उधळत शिवजन्मोत्सव, हजारोंच्या संख्येने युवकांची उपस्थिती; महाराजांच्या मुर्तीचं वाटप
Maharashtra News Live Update : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा राज्यभरात उत्साह