ठाणे: जिल्ह्यातील (Thane School Reopen) ग्रामीण भागातील 987 शाळा आणि शहरी भागातील शाळा देखील आजपासून सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील पाचवी पासूनचे पुढील इयत्तांचे वर्ग यापूर्वीचं सुरु करण्यात आले होते. आजपासून ठाण्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरु होणार आहेत. राज्य सरकारनं (Maharashtra Government) जारी केलेल्या नियमावलीनुसार शाळा सुरु करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता.
ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणेचं ठाणे शहरातही पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरु होत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून 1 डिसेंबर रोजी शाळा सुरु करण्याचा आदेश 29 नोव्हेंबरला काढण्यात आला होता. त्यामध्ये देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत राज्यातील पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला होता. ठाण्याप्रमाणेचं तिथं देखील शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. कल्याण डोंबिवलीतील प्राथमिक शाळा सुरु करण्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या शाळांची संख्या 3 हजार 420 आहे. या शाळांमधील विद्यार्थी संख्या साडे दहा लाख इतकी आहे. महापालिकेनं आजपासून पूर्ण क्षमतेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात जोरदार तयारी करण्यात आली आहे. या वेळी शाळा कोणत्याही स्थितीत सुरू केल्या जाणार असून यामध्ये तूर्तास कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले.
इतर बातम्या:
Thane School Reopen schools to reopen from today in rural and urban area check here for guidelines