तीन बोटांनी दिली परीक्षा, गंभीर आजाराशी झुंज, तरीही UPSC क्लिअर; सारिकाच्या जिद्दीला सलाम
केंद्रीय लोक सेवा आयोग म्हणजे यूपीएससीचे 2023चे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे राहणाऱ्या आदित्य श्रीवास्तवने पहिला नंबर पटकावला आहे. देशभरातून तो पहिला आहे. यूपीएससीची परीक्षा क्रॅक करणाऱ्या 1016 उमेदवारांमध्ये दोन मुली प्रचंड चर्चेत आहेत. या दोन्ही मुली दिव्यांग असल्याने त्या चर्चेत आहेत. त्यातील एकीचं नाव सारिका आहे. तिला सेरेब्रल पाल्सी नावाचा आजार आहे.
यूपीएससीची परीक्षा ही देशातील सर्वात कठिण परीक्षा आहे. ही परीक्षा पार करण्यासाठी परीक्षार्थी दिवस रात्र मेहनत करत असतात. मात्र, त्यात अत्यंत कमी लोकांनाच यश येतं. अनेकजण अनेकदा परीक्षा देऊनही यशस्वी होत नाहीत. या वर्षी यूपीएससीच्या परीक्षेत 1 हजार 16 उमेदवारांची निवड झाली आहे. त्यापैकी एक केरळच्या कोझिकोड येथील सारिकाही आहे. ही परीक्षा पास करण्यासाठी सारीकाने प्रचंड संघर्ष केला. केवळ परीक्षेपुरताच तिचा संघर्ष नव्हता तर तिचा संघर्ष हा वैयक्तिक पातळीवरचाही होता.
सारीका केरळच्या कोझिकोड येथील रहिवासी आहे. ती सेरेब्रल पाल्सी सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. या आजाराने सारीकाला पूर्णपणे वेठिस धरलं आहे. तिचे फक्त तीनच बोटं काम करत आहेत. ती तिच्या उजव्या हाताचा वापर करू शकत नाही. व्हिल चेअरला कंट्रोल करण्यासाठी तिला डाव्या हाताचा वापर करावा लागतो. ती चालू फिरू शकत नाही. एवढी मोठी अडचण असूनही तिने अभ्यासापुढे हात टेकले नाही. आजारावर मात करून, अनेक अडचणींचा सामना करून तिने सिव्हिल सेवेत जाण्याचं आपलं लक्ष पूर्ण केलं आहे. सारीका अवघी 23 वर्षाची आहे. यूपीएससीच्या परीक्षेत तिने 922 वी रँक घेतली आहे. परीक्षा देण्यासाठी तिला रायटर होता. पण तिने सुद्धा तीन बोटांनी परीक्षा देऊन घवघवीत यश मिळवलं आहे. पदवी घेतल्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती. तिने ऑनलाईन क्लासही ज्वॉईन केला होता.
हे त्यांचंच यश
या परीक्षेत यश मिळाल्याने सारीका प्रचंड खूश आहे. परीक्षा देण्यासाठी मला रायटर मिळाला होता. प्रीलिम्स कोझिकोडमध्ये झाल्या होत्या. मेन्स एक्झाम तिरुवनंतपुरममध्ये झाली. या ठिकाणी मला आठवडाभर राहावं लागलं. त्यासाठी आईवडिलांनी घर भाड्याने घेतलं होतं. सारिकाचे वडील सौदी अरबमध्ये कतारमध्ये नोकरी करतात. पण माझ्या परीक्षेसाठी म्हणून ते भारतात आले. दिल्लीत मुलाखत झाली. त्यावेळी मी केरळ हाऊसमध्ये राहिले होते. त्यावेळीही माझ्यासोबत आईवडील होते. त्यांनी मला पूर्ण सहकार्य केलं. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी यूपीएससी क्रॅक करू शकले. मला याचा खूप आनंद होतोय. या यशाचं सर्व श्रेय त्यांचंच आहे, असं सारिका म्हणाली.
मुलाखतीत काय विचारलं?
मला मुलाखतीत ग्रॅज्यूएशनशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच कोझिकोडच्या विषयी मला विचारण्यात आलं होतं, असं तिने सांगितलं. दिल्लीत मुलाखतीला येण्यासाठी ती व्हिलचेअरवरूनच आली होती. सारिकाच्या वडिलांचं नाव संशींद्रन आहे. तर आईचे नाव राकिया आहे. तिला एक छोटी बहीण आहे. ती प्लस टूची विद्यार्थीनी आहे.
सेरेब्रल पाल्सी काय आहे?
सेरेब्रल पाल्सी मस्तक आणि मांसपेशींशी संबंधित आजार आहे. हा आजार मुलांमध्ये होतो. चार वर्षाच्या आतील मुलांमध्ये हा आजार पाहायला मिळतो. हा संसर्गजन्य आजार नाही. मेंदूतील एखाद्या डॅमेजमुळे हा आजार होतो. जन्मापूर्वी किंवा जन्मानंतर लगेच हा आजार होत असतो. या आजाराची लक्षण प्रत्येकामध्ये वेगवेगळी आढळून येतात. या आजारात मांसपेशी ताणल्या जातात. मांसपेशी आखडल्या जातात. शरीराचा एक हिस्सा दुसऱ्या भागाच्या तुलनेत फार क्रियाशील नसतो. अन्न गिळताना त्रास होतो. बोलताना शब्द उच्चारले जात नाहीत. तोंडातून सारखी लाळ टपकत असते. पाय वाकडे होतात, त्यामुळे चालताना त्रास होतो.