कुस्तीच्या रिंगमधून राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या विनेश फोगाट यांनी बाजी मारली आहे. हरियाणात जुलानामधून त्या काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवत होत्या. विनेश फोगाट यांनी भाजपाच्या कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव केला. भाजपाने जुलानामधून बैरागी यांच्या रुपाने एक दलित चेहरा दिला होता. इंडियन नॅशनल दलने सुरेंद्र लाठर, आम आदमी पार्टीकडून कविता देवीसह एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. 14 व्या फेरी अखेर विनेश फोगाट जुलानामधून 5557 मतांनी आघाडीवर होती. फक्त एकच राऊंड बाकी होता. जुलाना विधानसभा मतदारसंघ जिंद जिल्ह्यात येतो. 2005 मध्ये काँग्रेस उमेदवाराने शेवटची जुलानामधून निवडणूक जिंकली होती.
दोन महिन्यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये थोडक्यात विनेश फोगाटच गोल्ड मेडल हुकलं होतं. अगदी काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला फायनलचा सामना खेळता आला नव्हता. विनेश ऑलिम्पिक समितीने अपात्र ठरवलं होतं. या निर्णयाला ऑलिम्पिक लवादात आव्हान देण्यात आलं. पण त्याचा फायदा झाला नाही. कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिज भूषण सिंह हटवण्यासाठी सुद्धा विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांनी मोठं आंदोलन केलं होतं.
19 वर्षानंतर काँग्रेसचा विजय
2009 ते 2019 पर्यंत जुलानामधून INLD च्या उमेदवार निवडून आला आहे. 2005 नंतर जवळपास 19 वर्षांनी जुलानामधून विनेश फोगाटच्या रुपाने काँग्रेसला ही जागा जिंकता आली आहे. विनेश फोगाटने निवडणूक जिंकली असली, तरी हरियाणामध्ये भाजपा सत्तेची हॅट्ट्रीक करणार असं चित्र आहे. बातमी लिहिताना भाजपा 50 तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे.