Goa Assembly Elections 2022 : लिहून देतो, गोव्यात भाजपला बहुमत मिळणार नाही; संजय राऊतांनी भाजपला पुन्हा डिवचले
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. लिहून देतो... त्यांना काहीही करू द्या. गोव्यात भाजपला बहुमत मिळणार नाही, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. लिहून देतो… त्यांना काहीही करू द्या. गोव्यात भाजपला बहुमत मिळणार नाही, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपला जोरदार हल्ला चढवला आहे. मी लिहून देतो, कालही सांगितलं होत गोव्यात भाजपला बहुमत नाही मिळणार. फार काय तोडफोड करतील, खरेदी विक्री करतील, आलेमाव गेलेमावला घेऊन येतील पण बहुमत मिळणार नाही. बहुमत न मिळणं आणि सरकार बनवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जनता तुम्हाला रिजेक्ट करेल आणि तरीही तुम्ही सरकार बनवणार हे लोकशाही विरोधी असेल, असं राऊत यांनी सांगितलं. गोव्यात आम्ही 12 जागा लढत आहोत. राष्ट्रवादी 7 किंवा 8 जागा लढणार आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
एक दिवस गोव्यात सत्ता येईल
यावेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं. मी शेलारांना उत्तर दिलं आहे. विरोधक-सत्ताधारी एकमेकांना चहा पाजत असतात. आमची वैक्तिगत दुश्मनी नसते. शेलारांची भूमिका असेल तर पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह अनेक राज्यात भाजपचे डिपॉझिट गूल झालं आहे. तरीही ते लढत आहेत. त्याचा हिशोब घ्यावा लागेल. लोकशाहीत निवडणुका लढणं हा आमचा अधिकार आहे. एखाद दुसरी निवडणूक हरलो म्हणजे निवडणूक लढायची नाही असं काही संविधानात लिहिलं नाही. लढत राहू. एक दिवस गोव्यात आमचं राज्य येईल, असं ते म्हणाले.
माफिया भाजपचा नवा चेहरा
मी आज नाही गेल्या अनेक वर्षांपासून गोव्याचं राजकारण जाणून आहे. उत्पल पर्रिकर असो लक्ष्मीकांत पार्सेकर हे दोन प्रमुख नेते आणि तिसरे श्रीपाद नाईक तेही नाराज आहेत. पार्सेकर आणि मनोहर पर्रिकर हे गोव्यातील भाजपचे प्रमुख नेते होते. 25 वर्षापूर्वी प्रमुख कार्यकर्ते होते. त्यांनी भाजपला मोठं केलं गोव्यात. दोन्ही नेत्यांनी त्याग केला. दोन्ही नेते गोव्यातील भाजपचे मुख्य चेहरा होते. आज उत्पल पर्रिकर आणि पार्सेकर यांनी पक्ष सोडला आहे. आज माफियांना भाजपने नवा चेहरा बनवला आहे. पण गोव्यातील जनता सर्व पाहत आहेत, असंही ते म्हणाले.
चंद्रकांतदादांना शुभेच्छा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. त्यावरूनही त्यांनी त्यांना फटकारले. करू द्या मागणी. त्यांचा वेळ जात नाही सध्या. पुढील तीन वर्ष त्यांना हेच करायचं आहे. सरकारला दोन वर्ष होऊन गेली. तीन वर्ष चालेल. विरोधी पक्षाकडे काही काम उरलं नाही. विरोधी पक्ष हा ताकदीनं फार मोठा आहे. त्यांनी विधायक काम करायचं ठरवलं तर चांगलं काम करू शकतात. पण त्यांच्याकडे वेळ घालवायचं काहीच साधन नसल्याने अशा प्रकारचे उद्योग करत आहेत. त्यात राजभवनाला सामील करून घेत आहेत. करू द्या त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
ही भाजपची सोय
निवडणूक प्रचार रॅलींवरील बंदी कायम आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही सोय केवळ भाजपची आहे. मला वाटतं. त्यांच्या सभांना गर्दी जमणार नाही बहुतके. पंतप्रधानांच्या उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील सभांना अजिबात गर्दी जमली नव्हती असं म्हणतात. त्यामुळे त्यांची सोय आहे का हे थोडं तपासून पाहावं लागेल, अशी खोचक टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरे संवाद साधणार
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे संवाद साधतील आणि महाराष्ट्रातील शिवसेनेची पुढील दिशा मांडतील, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या: