Goa Assembly Election | 4 बायका 4 नवरे, निवडणुकीत एकत्र उतरले! तिघे जिंकले, कोण हरले?
Goa Assembly Election Result Live 2022 : एकूण चार दाम्पत्यांपैकी तिघांचा गोव्यात विजय झाला. तर एकाचा पराभव झाला. विशेष म्हणजे जर मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नीला भाजपनं तिकीट दिलं असतं, तर कदाचित आज भाजप...
मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. या निकालांनी भाजपला पुन्हा एकदा सरकार स्थापन (Goa government formation) करण्याची संधी मिळाली आहे. मात्र गोव्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक अनोखा निकाल संपूर्ण देशानं पाहिलं. छोट्या गोव्यात (Goa Assembly Election Result) एक दोन नव्हे तर तब्बल चार दाम्पत्यांनी आपलं नशीब आजमावलं. या निवडणुकीत नवरा आणि बायको, असे दोघेही विधानसभेसाठी आपलं नशीब आजमवत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील तीन दाम्पत्यांना यशही मिळालंय. फक्त दाम्पत्याच्या पदरी निराशा पडली आहे. गोव्यात भाजपला 20 जागी विजय मिळवता आला आहे. भाजपच्या जागा वाढल्या असून दुसरीकडे काँग्रेसच्या जागा मात्र वाढल्यात. या सगळ्या निवडणूक निकालांच्या घडामोडींमध्ये नवरा बायको (Husband Wife) अशा दोघांनीही नशीब आजमवलेल्या गोव्यातील इंटरेस्टिंग लढतीबद्दल जाणून घेऊयात.
गोव्यात एकट्या भाजपनं दोन दाम्पत्यांना उमेदवारी दिली होती. तिसवाडी आणि सत्तरी तालुक्यात ही उमेदवारी देण्यात आली होती. उत्तर गोव्यात मोडणाऱ्या या दोन्ही तालुक्यात उमेदवारी दिलेल्या दोन्ही दाम्पत्यांनी भाजपचा विश्वास सार्थकी लावलाय. उमेदवारी देण्यात आलेल्या दोघाही दाम्पत्यांचा विजय झालाय.
कोण होते भाजपचे उमेदवार दाम्पत्य?
सत्तरी तालुक्यातील वाळपई मतदारसंघात आणि पर्ये मतदारसंघात विश्वजीत राणे आणि त्यांची पत्नी दिव्या राणे यांचा विजय झाला आहे. पर्ये हा खरंतर काँग्रेसचा गड मानला जातो. मात्र विश्वजीत राणे यांच्या वडिलांना आजीवन कॅबिनेट दर्जा देण्यात आल्यानंतर भाजपनं या ठिकाणी राणेंच्या सुनेला तिकीट दिलं. विश्वजीत राणेंचा वाळपईतून तर त्यांच्या पत्नी दिव्या राणे यांनी पर्येतून विजयी झेंड फडकवलाय.
उत्तर गोव्यातील तिसवाडीमध्ये मोडणारा पणजी आणि ताळगाव या दोन्ही मतदारसंघातही भाजपनं बाजी मारली. पणजी मतदारसंघात उत्पल पर्रिकर यांना तिकीट न देता बाबुश मॉन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर ताळगावमधून बाबुश यांच्या पत्नी जेनिफर मॉन्सेरात यांनी निवडणूक लढवली होती. जेनिफर मॉन्सेरात या डॉ. प्रमोद सावंत मंत्रिमंडळात महसूल मंत्रीही होत्या. मॉन्सेरात दाम्पत्यानं आपला पणजीत आपलं निर्विवाद वर्चस्व कायम ठेवलंय. मॉन्सेराता नवरा-बायकोच्या विजयानं पुन्हा एकदा पणजीवर आपलाच दबदबा असल्याचं बाबुश यांनी सिद्ध केलंय. मात्र त्याआधी त्यांना उत्पल पर्रिकरांनीही कडवी झुंज दिल्याचं चित्र निकालातून पाहायला मिळालंय.
दुसरीकडे 2019 साली काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले आणि डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदासोबत कृषी मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेले चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांना मात्र विजयी होता आलं नाही. त्यांची पत्नीदेखील विधानसभेच्या निवडणुकीला सामोरी गेली होती. अपक्ष निवडणूक कवळेकर यांच्या पत्नीनं लढवली होती. मात्र या दाम्पत्याचा निवडणुकीत पराभव झाला.
भाजपनं नाकारलं, काँग्रेसनं स्वीकारलं!
दरम्यान, निवडणुकीआधी नवरा-बायको असं दोघांनाही तिकीट कसं द्यायचं, हा विषय चांगलाच गाजला होता. कळगुंटचे आमदार मायकल लोबो यांनी आपल्या पत्नीला भाजपनं उमेदवारी द्यावी म्हणून आग्रह धरला होता. पण त्यांची मागणी काही मान्य झाली नाही. मधल्या काळात मायकल लोबो यांच्या दिल्ली वाऱ्याही झाल्या. पण दिल्लीतूनही अपेक्षित प्रतिसाद मायकल लोबो यांना मिळाला नाही. शेवटी निवडणुकीच्या तोंडावर नाराज मायकल लोबो यांनी पत्नीसह काँग्रेसचा ‘हात’ हातात घेतला.
काँग्रेसकडून मायकल लोबो यांना कळंगुट तर त्यांची पत्नी डिलायला लोबो यांना शिवोली मतदासंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. या दोघांनीही मिळालेल्या संधीचं सोनं केलं. लोबो दाम्पत्याचा गोवा विधानसभेच्या निवडणुकीत विजयही झाला.
…नाहीतर भाजप बहुमतात आली असती!
अशाप्रकारे एकूण चार दाम्पत्यांपैकी तिघांचा गोव्यात विजय झाला. तर एकाचा पराभव झाला. विशेष म्हणजे जर मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नीला भाजपनं तिकीट दिलं असतं, तर कदाचित आज भाजप आपलं 2022 मध्ये 22 एकहाती मिळवण्याचं स्वप्न पूर्ण शकली असती. कारण मायकल आणि डिलायला लोबो हे निवडून येतीलच, अशी शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली होती. तसं जर झालं असतं, तर चार पैकी तीन दाम्पत्यांना उमेदवारी देत विजय मिळवण्याचा अनोखा विक्रमच गोवा भाजपच्या नावावर झाला असता, हे वेगळं सांगायला नको!
Many congratulations to @visrane for winning @BJP4Goa Valpoi Assembly Constituency elections with over 8300 votes pic.twitter.com/1IzwzWFfHg
— SADANAND SHET TANAVADE सदानंद शेट तानावडे (@ShetSadanand) March 10, 2022
संबंधित बातम्या :
Goa Assembly Election 2022 Result LIVE : गोवा विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य
गोव्यात जे पर्रिकर, गडकरींना नाही जमलं ते फडणवीसांनी करुन दाखवलं! महाराष्ट्रात जोर वाढणार?
Goa Election Result 2022 | कोणाला 49, कोणाला 55, सर्वाधिक 342, गोव्यात शिवसेना उमेदवारांना किती मतं?