Goa Elections 2022 : गोव्यात राष्ट्रवादीचे 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीनेही रणशिंग फुंकले
राष्ट्रवादीकडून गोव्यात किती उमेदवार लढार हे स्पष्ट झालं आहे. गोव्यामध्ये राष्ट्रवादीचे 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रचारासाठी 9 ते 12 फेब्रुवारीपर्यंत गोव्यात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
मुंबई : पाच राज्यात सध्या निवडणुकांचे (Five State Election 2022) चौघडे वाजत आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारतोफा धडाडत आहेत. गोव्यात भाजपची कोंडी (Goa Elections 2022) करण्यासाठी आणि भाजपला सत्तेतून (Bjp Vs Shivsena) खाली खेचण्यासाठी महाराष्ट्रातील दोन राजकीय पक्ष सध्या चांगलाच जोर लावत आहे. एकिकडून शिवसेनेने भाजपला घायळ करण्याचा डाव आखलाय, तर दुसरीकडून राष्ट्रवादीनेही रणशिंग फुंकले आहे. राष्ट्रवादीकडून गोव्यात किती उमेदवार लढार हे स्पष्ट झालं आहे. गोव्यामध्ये राष्ट्रवादीचे 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रचारासाठी 9 ते 12 फेब्रुवारीपर्यंत गोव्यात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. शिवसेना नेते संजय राऊत तर गोव्यात ठाण मांडून बसताना दिसून येत आहेत. उत्पल पर्रीकरांना पाठिंबा जाहीर करून भाजपला चेकमेट देण्याचा डाव शिवसेनेने आधीच टाकला आहे. तर दुसरीकडून राष्ट्रवादीनेही लढाईची तयारी सुरू केली आहे.
स्टार प्रचारकांची यादी जाहीर
गोव्यातील विधानसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. दिनांक 9 फेब्रुवारीला कॅबिनेट संपल्यावर गोव्याला प्रचारासाठी जाणार आहे व 12 तारखेपर्यंत तिथे प्रचार करणार असल्याचे सांगतानाच इतर नेत्यांचे कार्यक्रम जाहीर झाल्यावर कळवण्यात येईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. गोव्यात मनोहर पर्रीकर यांनी भाजपला उभारी दिली. मात्र वारंवार भाजप नेते ज्यांच्यावर आरोप करत होते त्यांनाच दोन – दोन जागा देण्यात आल्या. म्हणजे मूळ भाजप लोकांचे तिकीट नाकारता येते हे भाजपने स्पष्ट केले आहे असेही नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक याआधीही उत्तर प्रदेशात जाऊन प्रचार करून आलेत. उत्तर प्रदेशातही भाजपला कडवी झुंज देण्याची तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचाही उत्पल पर्रीकरांना पाठिंबा
पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर यांना जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत असून आमच्या पक्षाचा त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका गोव्याचे अध्यक्ष घेतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले. त्यामुळे उत्पल पर्रीकरांना राष्ट्रवादी पाठिंबा देणार हे आता स्पष्ट झालं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं उत्पल पर्रीकरांची ताकद आणखी वाढली आहे. तसेच भाजपने पणजीतून दिलेला उमेदवार माफिया असल्याची टीका वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे त्याचाही फायदा उत्पल पर्रीकरांना होण्याची शक्यता आहे. दिवंगत नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना गोव्यातील जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत होता. त्यामुळेच देशपातळीवर मनोहर पर्रीकरांना मोठे स्थान देण्यात आले होते. आता पणजीतली जनता उत्पल पर्रीकरांच्याही पाठीमागे अशीच उभी राहणार का? याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.