पणजी : पणजीत शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) उमेदवार मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच भाजपवर (Bjp) पुन्हा निशाणा साधला आहे. गोव्यात उत्पल पर्रीकरांना (Utpal Parrikar) खंबीर पाठिंबा देणार आहे, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे. त्यानंतर त्यांनी भाजपवर निशाणा साधताना ही लढाई कार्यकर्ता आणि माफिया यांच्यातील आहे, अशी घणाघाती टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्यावर बलात्कारापासून अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत, असे वक्तव्य राऊतांनी केले आहे. अशा गुन्हेगार उमेदवाराला विरोध करण्यासाठी उत्पल पर्रिकर उभे आहेत. राजकारणाचा चेहरा बेसुर झाला आहे. त्यामुळे तो बदलायचा असेल तर प्रामाणिक उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे आणि त्याची सुरूवात पणजीपासून झाले पाहिजे असे आवाहन राऊतांनी केले आहे.
पणजीचा आदर्श घ्या
भाजपवर टीका करतानाच गोव्यातल्या मतदारांनी प्रत्येक मतदार संघाने पणजीचा आदर्श ठेवला पाहिजे, जिथे जिथे असे उत्पल पर्रीकर उभे आहेत, त्यांना सपोर्ट केला पाहिजे, असे म्हणत भाजपच्या बंडखोरांना सपोर्ट करा असे आवाहनच राऊतांनी करून टाकले आहे. तसेच उत्पल पर्रीकर यांना समर्थन देण्यासाठी आमच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते उत्पल पर्रिकर यांचा प्रचार करतील. भाजपने यातून आत्मचिंतन करावं, असा सल्लाही राऊतांनी भाजपला दिला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा गोव्यात प्रचारासाठी आले होते. ते भाजपकडून उभ्या असलेल्या उमेदवारावरती गुन्हे आहेत, अशांसाठी देशाचे गृहमंत्री मत मागत होते का? याचे मला आश्चर्य वाटलं, असा टोलाही अमित शाह यांना लगावला आहे.
गोव्यात भाजपला चेकमेट देण्यासाठी राऊतांनी हे जाळं टाकलं आहे. यात आता भाजप फसणार ही शिवसेनेचे हे जाळं तोडून पणजीचा गड राखणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र शिवसेने उमेदवार मागे घेतल्याने आणि उत्पल पर्रीकरांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपसाठी निवडणूक नक्कीच कठिण झालीय. फक्त गोव्यातच नाही तर उत्तर प्रदेशातही भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर प्रदेशात गड राखण्यासाठी योगी आदित्य आणि भाजप पूर्ण जोर लावताना दिसून येत आहे.